'नारायण राणे मुख्यमंत्री व्हावेत असे त्यांच्या मुलाला वाटत नाही'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

ते सातत्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केली.

कणकवली (सिंधुदुर्ग) : गेली १५ वर्षे मुख्यमंत्री होणार असे नारायण राणे सांगत आहेत; पण आमदार नीतेश राणेंना हे मान्य नसावे. त्यामुळेच ते सातत्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केली.

आमदार आणि कार्यकर्ते थोपवून धरण्यासाठी महाविकास आघाडी कोसळणार असल्याच्या अफवा भाजपची नेतेमंडळी पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नाईक यांनी येथील विजय भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘गेली १५ वर्षे नारायण राणे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत; पण वस्तुस्थिती काय आहे ही त्यांच्या मुलानेच दाखवून दिली. त्याबद्दल नीतेश राणे यांचे अभिनंदन करतो. पुढील काळात राणे नव्हे तर दुसरेच मुख्यमंत्री होतील, असा दावा खुद्द त्यांच्याच मुलाकडून केला जात आहे.’’

हेही वाचा -  तुझ्यावर मी खरे प्रेम करत नाही, असं तो म्हणाला अन् तिने उचलेले धक्कादायक पाऊल -

ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील जनतेला राणेंचे नेतृत्व मान्य नाही. भाजप कार्यकर्त्यांनाही राणे नकोसे झाले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना कणकवलीत यावे लागले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचे संकट निर्माण झाले; मात्र या काळातही महाविकास आघाडी सरकारने दमदार कामगिरी केली आहे. 

सिंधुदुर्गात राणेंना २५ वर्षांत जे जमले नाही, त्या शासकीय मेडिकल कॉलेजला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी मिळवून दिली. जिल्ह्यात कोविड लॅबची उभारणी झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताला चांगला दर मिळाला. मच्छीमारांना ६५ कोटीची नुकसान भरपाई जाहीर झाली. तर पुढील काळात भातपीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही भरपाई जाहीर 
होणार आहे.’’

हेही वाचा - सावधान! रेल्वेत झोपत असाल तर थोडं जपून -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vaibhav naik statement criticised on rane family on the topic of CM of maharashtra in sindhudurg