वैभववाडी : ‘नापणे ऊस संशोधन’चा रडतखडत प्रवास

निधीचा अभाव; इमारतीसह पायाभूत सुविधांची गरज कायम
 हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण sakal

वैभववाडी: हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नापणे (ता.वैभववाडी) ऊस संशोधन केंद्राची वाटचाल आवश्यक निधीअभावी रडतखडत सुरू आहे. त्यामुळे या केंद्रासाठी इमारत, लॅब आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, अशी मागणी स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

गगनबावडा तालुक्यातील असळज येथे डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात ऊस लागवडीला चालना मिळाली. गेल्या दहा बारा वर्षात शंभर-दीडशे टनावरून ऊस उत्पादन १ लाख टनावर गेले आहे. जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील दीड हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उत्पादन घेतले जाते. त्यामुळे २००८ मध्ये तत्कालीन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली. कोकणातील वातावरणानुसार ऊसाचे कोणते बियाणे लागवड करता येईल, त्यावर संशोधन होणे आवश्यक असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील या मागणीला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर सातत्याने या ऊस संशोधन केंद्राचा प्रश्नांचा पाठपुरावा विविध स्तरावर श्री. जठार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, किशोर जैतापकर, फोंडाघाट संशोधन केंद्राचे डॉ. विजय शेट्ये यांनी सुरू ठेवला होता. या ऊसंसशोधन केंद्रसाठी नापणे रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेली १७ एकर जागा निश्चित करण्यात आली. दरम्यान २०१९ मध्ये तत्कालीन कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी या जागेची पाहणीकेली आणि अवघ्या काही महिन्यात या ऊस संशोधन केंदाला मंजुरी दिली.

जमीन ताब्यात मिळाल्यानंतर संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक काम देखील सुरू करण्यात आले आहे. येथील वातावरणात ऊसाचे कोणते वाण सुरक्षित आणि अधिक उत्पादन देऊ शकते याची चाचपणी सुरू झाली आहे. डॉ. शेट्येच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यत ८ बियाण्यांवर प्रयोग केलेले आहेत; परंतु पुरेशी जागा असलेली इमारत, लॅब, स्वतंत्र कर्मचारी वर्ग आणि पायाभुत सुविधा नसल्यामुळे या संशोधन केंद्राच्या कामाला गती मिळेनाशी झाली आहे. दोन वर्षात कोणतीही तरतुद शासकीय पातळीवर न झाल्यामुळे संरक्षक भिंतीचे काम देखील पुर्ण झालेले नाही. त्यामुळे संशोधन केंद्राचा एकूणच प्रवास रडतखडत सुरू आहे. काही दिवसांपुर्वी संशोधन केद्रांसाठी लॅब, संरक्षक भिंत, आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; परंतु अजून त्याला देखील मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या ऊस संशोधन केंद्रांसाठी निधी मिळावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

बियाण्यांच्या चाचण्या

कोकणातील वातावरणात नेमक्या कोणत्या जाती अधिक उत्पादन देतील याची चाचपणी नापणे येथे सुरू आहे. यामध्ये सीओएम-०२६५, सीओम-९०५७, सीओ-८६०३२, सीओ ९२००५, सीओ-८०१४, सीओ-७५२७, एमएस-१०००१, सीओसी-६७१, व्हीएसआय-३१०२ या जातीची टेस्टींग सध्या सुरू आहे.

ऊस संशोधन केंद्र व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हे केंद्र तत्कालीन सरकारने मंजूर केले. संशोधन केंद्रांसाठी जमीन देखील उपलब्ध करून दिली. आता राज्य सरकारने या केंद्राला आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून या ऊस संशोधन केंद्राला गती मिळेल.

- प्रमोद जठार, माजी आमदार

ऊस संशोधन केंद्रासाठी इमारत, लॅब, स्वतंत्र कर्मचारी वर्ग यासाठी शासनपातळीवर निधीची तरतुद होणे गरजेचे असते. त्यानंतर ही कामे मार्गी लागतील. आम्ही तूर्तास उसाच्या काही जातीचे टेस्टिंग करण्याचे काम करीत आहोत. याशिवाय विद्यापीठांकडे तत्काळ लागणाऱ्या बाबींच्या पूर्ततेसाठी एक प्रस्ताव देखील पाठविला आहे.

- डॉ. विजय शेट्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com