निवडणुकीमुळे एसटी बसच्या अनेक फेऱ्या रद्द; प्रवाशांचा खोळंबा

अमित गवळे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नियमित वाहतुकीसाठी बसची संख्या अपुरी पडल्याने अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

पाली (जिल्हा रायगड) : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी (ता. 23) रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेस कामगिरीवर होत्या. परिणामी नियमित वाहतुकीसाठी बसची संख्या अपुरी पडल्याने अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

रायगड लोकसभा मतदारसंघात 2179 मतदान केंद्रावर 15 हजार कर्मचार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी सोमवारी (ता.22) सकाळीच एसटी बसने मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले. निवडणूक संपल्यानंतर मंगळवारी (ता.23) रात्री उशिरा या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ मतदारसंघात एसटी बसनेच सोडले जाणार आहे. त्यामुळे एसटी बसेस दोन दिवस गुंतल्या गेल्यात.

परिणामी, नियमित वाहतुकीवर ताण पडला. अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द झाल्या. याचा फटका प्रवासी व मतदानासाठी आलेल्या मतदारांना बसला. त्यांना वेळीच इच्छित ठिकाणी पोहचता आले नाही. वेळ वाया गेला तसेच गैरसोय देखील झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various Buses have been Canceled in Raigad for Election Work