चिपळूणच्या वेदवती केतकर संगीत नाट्य रंगभूमीवर  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vedavati Ketkar In Music Drama Ratnagiri Marathi News

वेदवती या येथील डॉ. विजयानंद व शिला केतकर यांच्या कन्या आहेत. वेदवती परांजपे यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गायनाचे शिक्षण डॉ. कविता गाडगीळ यांच्याकडे सुरू केले. गायनात विशारद व अलंकार या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.

चिपळूणच्या वेदवती केतकर संगीत नाट्य रंगभूमीवर 

चिपळूण ( रत्नागिरी ) -  चिपळूणची कन्या असलेल्या गायिका व अभिनेत्री वेदवती राहुल परांजपे-केतकर शनिवारी (ता. 15) संगीत सुवर्णतुला या सांगीतिक नाटकाद्वारे संगीत नाट्य रंगभूमीवर प्रवेश करीत आहेत. 

संगीत सुवर्णतुला हे नाटक शनिवारी (ता.15) पुण्यातील कोथरूड भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर केला जाणार आहे. यामध्ये वेदवती परांजपे या सत्यभामेची भूमिका साकारतील. त्यांच्यासोबत चिन्मय जोगळेकर, मेस्त्री, वैजयंती जोशी, निखिल केंजळे, ऋतुपर्ण पिंगळे, मोनिका असोलकर हे अभिनेते सहभागी होतील. 

वेदवती या येथील डॉ. विजयानंद व शिला केतकर यांच्या कन्या आहेत. वेदवती परांजपे यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गायनाचे शिक्षण डॉ. कविता गाडगीळ यांच्याकडे सुरू केले. गायनात विशारद व अलंकार या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. खल्वायन या संगीत प्रोत्साहक संस्थेच्या नाट्य संगीत स्पर्धेत त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी विजेतेपद मिळवले. सध्या त्या जयपूर घराण्याच्या गायिका सानिया पाटणकर यांच्याकडे गायकीचे शिक्षण घेत आहेत.

स्वरराज छोटा गंधर्व यांच्या शिष्या सुचेता अवचट यांच्याकडे त्यांनी गंधर्वकालीन गायनाचे व अभिनयाचे मार्गदर्शन मिळवले. त्यांच्या गायनाच्या कामगिरीची दखल घेऊन तिला भारत सरकारची शिष्यवृत्ती देखील मिळाली आहे. डीबीजे महाविद्यालयाचे त्यांनी आंतरविद्यापीठ स्तरावर गायन चमुचे सलग तीन वर्षे नेतृत्व केले. भारत गायन समाज, कालिदास संगीत स्पर्धेत त्यांनी यश मिळवले. त्यांनी संगीत क्षेत्रात ही कामगिरी केल्यानंतर आता त्या स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान निर्मित संगीत सुवर्णतुला या नाटकात गायन व अभिनय सादर करणार आहेत. 

पालकांनी त्यांच्या पाल्याची कलेची आवड ओळखून प्रोत्साहन दिले व समाजाने साथ दिली तर मोठी कामगिरी कलावंताकडून होते, हा अनुभव वेदवती परांजपे यांचे पालक नात्याने आम्ही घेतला. 
- सौ. शीला केतकर, चिपळूण.