
नगराध्यक्ष परब यांच्याशी चर्चला बसल्यानंतर त्यांनी सगळ्या प्रकाराचे खापर शिवसेनेच्या माथी मारले. रवी जाधव यांच्या स्टॉलच्या कारवाईनंतर झालेल्या उपोषण आणि केसरकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जाधव यांची घालून दिलेली भेट व नंतर अधिकारी यांना प्राप्त झालेले पत्र यामुळे ही कारवाई असल्याचा दावा केला.
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरातील भाजी मंडईबाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर येथील पालिका प्रशासनाकडून आज पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पालिका प्रशासनाविरोधात भाजी विक्रेते आक्रमक बनले. शिवसेनेचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी यात उडी घेतल्याने काही काळ वातावरण तापले; मात्र नगराध्यक्ष यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि दिलेल्या आश्वासनानंतर विक्रेत्यांनी नरमाईची भूमिका घेतली.
प्रशासनाकडून करण्यात येत असलेली कारवाई राज्याच्या आदेशानुसार तसेच नगरविकास खात्याकडून आलेल्या पत्रावरून होत आहे. याला स्थानिक आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जबाबदार असून आम्ही विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहू. वेळ पडल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसू. दोन दिवसात मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून यामध्ये तोडगा काढू, असे आश्वासनही नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले.
येथील पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या आदेशानुसार आज शहरातील भाजी मंडई बाहेर बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संबंधित भाजी विक्रेत्यांना बाहेर बसण्यास मनाई करत त्यांना भाजी मंडईमध्ये बसण्याच्या सूचना पालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्या; मात्र आतमध्ये व्यापार होत नसल्याने आक्रमक झालेल्या विक्रेत्यांनी कारवाईच्या विरोधात थेट पालिका कार्यालय गाठले.
यावेळी विक्रेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्याधिकारी कारवाईवर ठाम राहिल्याने ही चर्चा फिस्कटली.
अखेर विक्रेत्यांनी पालिकेमध्ये बस्तान ठोकत नगराध्यक्ष परब यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले; मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेनंतर आक्रमक झालेल्या विक्रेत्यांना अश्रूही अनावर झाले. प्रशासन गरिबांचे नसून श्रीमंतांचे आहे. पालिका स्थानिक लोकांची नसून ती परप्रांतीयांची आहे. म्हणूनच आमच्यावर अन्याय करून परप्रांतीयांना याठिकाणी अभय दिले जात आहे. जर आमच्यावर कारवाई होत असेल तर तलावाकाठी बाजारही बसवू नका. आम्ही धुणी भांडी करून घर संसार चालवु; मात्र एकट्या भाजीविक्रेत्यावरील अन्याय सहन करणार नाही, अशा इशाराही दिला.
नगराध्यक्ष परब यांच्याशी चर्चला बसल्यानंतर त्यांनी सगळ्या प्रकाराचे खापर शिवसेनेच्या माथी मारले. रवी जाधव यांच्या स्टॉलच्या कारवाईनंतर झालेल्या उपोषण आणि केसरकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जाधव यांची घालून दिलेली भेट व नंतर अधिकारी यांना प्राप्त झालेले पत्र यामुळे ही कारवाई असल्याचा दावा केला. त्यावेळी त्याठिकाणी चर्चेत उपस्थित असलेले शिवसेनेचे नगरसेवक परुळेकर यांनी ते पत्राचे वाचले व भाजी विक्रेत्यांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करा, असा आदेश त्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे सुरू असलेली चर्चा फिस्कटली व नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांशी चर्चा टाळली. यावेळी डॉ. परुळेकर आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
डॉ. परुळेकर यांनी व्यापाऱ्यांना शिवसेना तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील. कोण कारवाई करतो ते आम्ही बघू. तुम्ही तुमचा व्यवसाय करा, असे सांगितले; मात्र यावेळी व्यापाऱ्यांमध्ये एकजूट असल्याचे दिसून आले नाही. काही व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष केबिनमध्ये जाऊन परब यांच्याशी चर्चा केली. यावेळी हा प्रकार कोण करत आहे? आणि व्यापाऱ्यांना कोण भडकवत आहे? याबाबतचे म्हणणे श्री. परब यांनी त्यांच्याकडे मांडले. त्यांनी मुख्याधिकारी यांना राज्याकडून आलेले इंग्रजीमधील पत्र व्यापाऱ्यांसमोर सादर केले व या पत्रामुळे ते कारवाई करत असल्याचे सांगितले. जर त्यांनी कारवाई केली नाही तर त्यांना निलंबित व्हावे लागेल. त्यामुळे ते आपली भूमिका पार पडत असल्याचे सांगितले; मात्र असे असले तरी मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे.
मला दोन दिवसांची मुदत द्या. मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू. वेळ पडल्यास शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असे आश्वासन विक्रेत्यांना दिले. विक्रेत्यांनी आश्वासन मान्य करत दोन दिवस काय, आठ दिवस थांबू; मात्र आम्हाला न्याय द्या, असे सांगितले.
"" केलेली कारवाई ही शासन नियमाला धरून आहे. या ठिकाणी भाजी मंडईमध्ये जागा मर्यादित आहे आणि विक्रेते जास्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी अडचण निर्माण होते. शासन नियमाप्रमाणे जाण्या येण्याचा रस्ता हा मोकळा ठेवलाच पाहिजे. मी यासाठी दोन दिवसापूर्वी व्यापाऱ्यांना भेटून हात जोडून विनंती केली होती; मात्र कुणीच विक्रेते न ऐकल्याने ही कारवाई करण्यात आली. ''
- जयंत जावडेकर, मुख्याधिकारी
डॉ. परुळेकर यांना आम्ही बोलावले नाही
डॉ. परुळेकर यांनी वाचलेले पत्र व मांडलेले मुद्दे याच्याशी आम्ही सहमत नाही. त्यांना सभागृहामध्ये आम्ही बोलावले नाही. आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण करत नसून आम्हाला आमच्या व्यवसायाशी संबंध आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा उपस्थित महिला तसेच पुरुष भाजी विक्रेत्यांनी नगराध्यक्षांकडे मांडली. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.
...तर कारवाईचा बडगा उगारणार
विक्रेत्यांना भडकवण्याचे काम शिवसेना आणि काहीजण करत आहेत. याठिकाणी यापुर्वीसारखे ढोल बडवत आंदोलन करण्याचा कोणी प्रकार केल्यास त्यांच्यावर 353 खाली गुन्हा दाखल करू. जे काय करायचं असेल ते पालिका इमारत हद्दीच्या बाहेर करा, असा इशाराही यावेळी नगराध्यक्ष परब यांनी दिला.
पोलखोल केल्यानेच नगराध्यक्ष बाहेर पडले - जयेंद्र परूळेकर नगरविकास मंत्री त्यांच्या कार्यालयाकडून मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या पत्राचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्याबाबत मी पोलखोल केल्यानंतर नगराध्यक्ष सभागृहाबाहेर पडल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
श्री. परूळेकर यांनी आज भाजी विक्रेत्यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकारानंतर सभागृहात पार पडलेल्या बैठकीला उपस्थिती लावली. माजी नगरसेवक संजय पेडणेकर हेही यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्षांनी झालेला प्रकार हा शिवसेनेमुळेच घडला आहे. नगरविकास खात्याकडून आलेल्या पत्रामुळे अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले; मात्र याला डॉ. परूळेकर यांनी रोखत हे पत्र विक्रेत्यांना वाचून दाखवले व चुकीचा अर्थ लावून सत्ताधारी ही कारवाई करत असल्याचे सांगितले.
यामुळे चर्चेसाठी आलेले नगराध्यक्ष संजू परब व कार्यकर्ते चर्चा सोडून निघून गेल्याचा दावा डॉ. परूळेकर यांनी केला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, "मी नगराध्यक्षांच्या खेळीचा पोलखोल केल्याने त्यांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. काही झाले तरी आम्ही विक्रेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार.''