दुर्लक्षपणा; न्याय द्या! वेळागरच्या भूमिपुत्रांच्या काय आहेत मागण्या?

दीपेश परब
Saturday, 12 September 2020

शासनाने स्थानिक भूमीपुत्रांच्या मागण्यांचा योग्य विचार करून तोडगा काढावा व न्याय द्यावा, अशी भूमिका मांडली व तसे निवेदन तेली यांना दिले. 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - वेळागर येथील ज्या भूमीपुत्रांच्या मालकीच्या जमिनी पर्यटन विकासाच्या नावाखाली पंचतारांकित हॉटेल कंपनीला देण्याचा राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विद्यमान राज्य सरकारने 90 वर्षांचा जो नवीन करार केला आहे, त्याबद्दल भूमीपुत्रांमध्ये नाराजी आहे. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दुर्लक्षित मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहचवून न्याय मिळावा, यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याची भावना व्यक्त केली होती. त्याप्रमाणे तेली यांनी वेळागर येथील लिंगेश्‍वर मंदिर येथे प्रत्यक्ष भेटून भूमीपुत्रांसोबत चर्चा केली. 

यावेळी शिरोडा वेळागर भूमिपुत्र संघाचे अध्यक्ष महादेव ऊर्फ भाई रेडकर तसेच खजिनदार जगन्नाथ डोंगरे, समितीचे सदस्य राजू आंदूरलेकर, विठ्ठल कांबळी यांनी सर्व्हे नं 29 ते 36 तसेच सर्व्हे न 39 आणि 212 व 213 मधील मालकीच्या जागा ज्या शासनाने कराराप्रमाणे 54 हेक्‍टरमध्ये समाविष्ट केल्या आहेत.

याचा न्यायालयीन लढा सुरू असल्याने त्या वगळून इतर शासनाच्या ताब्यातील जमिनीमध्ये पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून पर्यटन विकास करावा, ही मागणी यापूर्वीही होती आणि या पुढेही राहणार आहे. शासनाने स्थानिक भूमीपुत्रांच्या मागण्यांचा योग्य विचार करून तोडगा काढावा व न्याय द्यावा, अशी भूमिका मांडली व तसे निवेदन तेली यांना दिले. 

यावेळी वेळागर येथील वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू आमरे व समिती सदस्यांचीही भेट घेऊन तेली यांनी सर्व्हे नं 39 मधील जागा मालकांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, भाजप सिंधुदुर्ग सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, माजी सरपंच विजय पडवळ, भाजप शिरोडा उपाध्यक्ष संतोष अणसुरकर आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ 
राजन तेली म्हणाले, भाजप हा कधीही विकास प्रकल्पाच्या विरोधात नसून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होत असेल व रोजगार उपलब्ध होत असेल तर अशा प्रकल्पाचे स्वागतच करू. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण असू नये; परंतु विकासाच्या नावाखाली जर भूमीपुत्रांवर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू व भूमिपुत्रांसोबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करू. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Velagar villagers are angry about the government