विहिरीत श्‍वास कोंडून तिघे अत्यवस्थ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

वेंगुर्ले - तुळस येथे गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले असता बेशुद्ध पडलेल्या एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीतच अत्यवस्थ होऊन पडले. अखेर ऑक्‍सिजन सिलिंडर फोडून आत टाकल्याने त्यापैकी एकाला शुद्ध येऊन त्यांनी इतर दोघांना सुखरूप बाहेर काढले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला.

तिघांवरही उपचार सुरू आहेत. तुळस-फातरवाडी येथे विहिरीतील गाळ काढण्यास उतरले असता विहिरीचे मालक झिलू सहदेव नाईक (वय 48) ऑक्‍सिजन न मिळाल्याने श्वास कोंडून बेशुद्ध पडले. त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेले तेथीलच स्थानिक रहिवासी प्रवीण विनायक नाईक (37) बेशुद्ध पडले. झिलू नाईक व प्रवीण नाईक यांच्या जिवाला धोका आहे हे लक्षात येताच त्याठिकाणी असलेले एसटी चालक बापू नाईक हे मागचा पुढचा विचार न करता ताडपत्री घेऊन विहिरीत उतरले. त्यांचाही श्वास आतमध्ये कोंडू लागला. त्याच परिस्थितीत त्यांनी या दोघांनाही ताडपत्रीत गुंडाळून बाजूला ठेवले व त्यानंतर तेही बेशुद्ध झाले. दरम्यान ग्रामस्थांनी तत्काळ 108 रुग्णवाहिकेला बोलाविण्यात आले. त्यातील ऑक्‍सिजन सिलिंडर फोडून विहिरीत सोडल्याने तिघांचेही प्राण बचावले. यातील झिलू नाईक व बापू नाईक यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे दाखल करण्यात आले. या दोघांचीही प्रकृती आता ठीक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. एसटी कर्मचारी बापू नाईक यांच्या धाडसामुळे अनर्थ टळला. त्यांच्या या कार्याची दखल शासन पातळीवर घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vengurle konkan news