esakal | अत्यल्प प्रतिसादात चाकरमनी कोकणात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

very less response to travelling from chakrapani in konkan

आठ दिवसांत २९५ एसटी बसमधून पाच हजार चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल

अत्यल्प प्रतिसादात चाकरमनी कोकणात दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सुरू केलेल्या एसटी सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. गेल्या आठ दिवसांत २९५ एसटी बसमधून पाच हजार चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना होम क्‍वारंटाईन करून ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनामुळे देशातच नव्हे तर जगभरातील परिस्थिती गंभीर बनत आहे. कोरोनाला सामोरे जाण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात टाळेबंदी करण्यात आलेली असून आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पास अत्यावश्‍यक करण्यात आला आहे. सर्वच चाकरमान्यांना खासगी गाड्यांतून प्रवास करणे शक्‍य नसल्यामुळे राज्य शासनाने एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा - शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका; संसार थाटला शेजाऱ्यांच्या गोठ्यात...

सोशल डिस्टन्सिंगसह प्रवाशांची तपासणी करून त्यांना जिल्ह्यात आणण्यास सुरवात झाली. आलेल्या चाकरमान्यांची तपासणी करून त्यांना गावामध्ये होम क्‍वारंटाईनसाठी पाठविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बारा ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर सुरू केली आहेत. चाकरमान्यांसाठी क्‍वारंटाईन कालावधी दहा दिवस केला होता. त्यानुसार १३ ऑगस्टपर्यंतच चाकरमान्यांना एसटीने आणले गेले. त्यांच्यासाठी एसटी प्रशासनाकडून २९५ एसटी बसमधून ४,९४६ प्रवासी आले. त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या गावामध्ये होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे.

त्यासाठी ग्रामकृतीदलाने गावातील रिकामी घरे घेतली होती. काहींना रिकाम्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तपासणी केंद्रावर प्रवाशांची नावनोंदणी करून तिथे आवश्‍यकता भासल्यास ॲन्टिजेन चाचणीचीही व्यवस्था केली होती. अटी-शर्थींसह कोरोनाच्या भितीने चाकरमान्यांनी कोकणात येण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ४५ हजार लोकांना होम क्‍वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. त्यातील बहुतांशी चाकरमानी आहेत. 

हेही वाचा -  कुठल्या जिल्ह्याच्या गणेशोत्सवावर आहे वादळी पावसाचे सावट...

कोकण रेल्वेच्या चार गाड्यांमधून केवळ १७१ प्रवासी
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार दिवसाला चार गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी या चार गाड्यांमधून १७१ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. या गाड्या रिकाम्या जात आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

loading image