पालीतील पशुवैद्यकीय दवाखाना बनला दारुड्यांचा अड्डा

अमित गवळे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

उंबरवाडी जवळ पशुवैद्यकीय दवाखाना आहे. रात्रीच्या वेळी काही दारुडे येथील व्हरांड्यात दारू ढोसतात. तसेच दारूच्या व बियरच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या व ग्लाससुद्धा तेथेच ठेवून जातात...

पाली (जि. रायगड) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या व्हरांड्यात रात्री नियमित दारुडे दारू पिण्यासाठी बसतात. त्यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे दारुड्यांचा अड्डा बनले आहे.

येथील उंबरवाडी जवळ पशुवैद्यकीय दवाखाना आहे. रात्रीच्या वेळी काही दारुडे येथील व्हरांड्यात दारू ढोसतात. तसेच दारूच्या व बियरच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या व ग्लाससुद्धा तेथेच ठेवून जातात. सोबत आणलेली चकन्याची पाकिटे व घाण येथेच टाकतात. येथे बाजूला लोकवस्ती आहे त्यांना देखील या दारुड्यांचा त्रास होतो. त्यामुळे वेळीच या दारुड्यांना आवर घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 
नियमितच येथे दारुडे दारू पिण्यासाठी बसतात. त्यांच्यामुळे या परिसरात घाण होते. तसेच सामाजिक स्वास्थ देखील बिघडते. वेळीच या दारुड्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे.
- बल्लेश सावंत, तरुण, पाली
 
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देतो. तसेच याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याच्या सूचना त्यांना देण्यात येतील.
- विनायक म्हात्रे, गटविकास अधिकारी, पाली-सुधागड

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The veterinary hospital in Pali became a place for Alcoholic drinkers