Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात तीन जागांसाठी 30 उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

सिंधुुदुर्गनगरी - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी 30 उमेदवारांनी 51 अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले. सर्वाधिक उमेदवार सावंतवाडी मतदारसंघात आहेत. कणकवलीमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी एबी फॉर्मसह अधिकृत उमेदवार दिल्याने तेथील लढत लक्षवेधी ठरली आहे. 

सिंधुुदुर्गनगरी - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी 30 उमेदवारांनी 51 अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले. सर्वाधिक उमेदवार सावंतवाडी मतदारसंघात आहेत. कणकवलीमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी एबी फॉर्मसह अधिकृत उमेदवार दिल्याने तेथील लढत लक्षवेधी ठरली आहे. 

विधानसभेच्या सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली मतदारसंघांसाठीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सावंतवाडीतून 12 उमेदवारांनी 21, कणकवलीतून 8 उमेदवारांनी 15, तर कुडाळमधून 10 उमेदवारांनी 15 अर्ज दाखल केले. यात कणकवलीत युतीमधील दोन्ही घटकपक्षांनी अधिकृत उमेदवार दिले. सावंतवाडीत राष्ट्रवादीने दोघांना एबी फॉर्मचे वितरण केले. 7 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून उद्या (ता. 5) अर्जांची छाननी होणार आहे. 

सावंतवाडीत 13 उमेदवार 
सावंतवाडी - येथील विधानसभा निवडणुकीसाठी तेरा जणांनी 21 उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी, बहुजन महा पार्टी, बसप, बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांसह तीन अपक्षांचा समावेश आहे. 
सावंतवाडी विधानसभेसाठी राजकारण चांगलेच रंगले असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 12 अर्ज दाखल केले. पहिल्या दिवशी नऊ अर्ज भरले गेले होते. एकूण 21 उमेदवारी अर्जामध्ये 12 जणांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी युतीमध्ये बंडखोरी करत एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये भाजपतर्फे एक, तर तीन अपक्ष अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चार अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या पत्नी पल्लवी केसरकर यांनी शिवसेनेकडून दोन अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीकडून बबन साळगावकर यांनी दोन अर्ज, तर अर्चना घारे-परब यांच्याकडून एक उमेदवारी अर्ज दाखल केला. 

बहुजन मुक्ती पार्टीकडून दादू ऊर्फ राजू गणेश कदम, मनसेकडून प्रकाश रेडकर, बसपकडून सुधाकर मांजरेकर, बहुजन महा पार्टीकडून यशवंत पेडणेकर, बहुजन वंचित आघाडीकडून सत्यवान जाधव, तर अपक्ष म्हणून अजिंक्‍य गावडे, राजन तेली, समाधान बांदवलकर यांचा समावेश आहे. 

कणकवलीत 8 उमेदवार 
कणकवली - विधानसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस आघाडी, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांसह आठ जणांनी पंधरा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना आणि भाजप युतीत उभी फूट पडली असून, स्वतंत्र उमेदवारीमुळे या मतदारसंघात हायव्होल्टेज लढत अपेक्षित आहे; मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे. 
भाजपमध्ये इच्छुक असलेले संदेश भास्कर पारकर यांनी दोन अपक्ष अर्ज, वंचित बहुजन आघाडीच्या ऍड. मनाली संदीप वंजारे यांनी अपक्षासह दोन अर्ज, तर नीतेश राणे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारीबरोबर अपक्ष मिळून तीन अर्ज दाखल केले. कॉंग्रेसचे सुशील अमृतराव राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजन शंकर दाभोळकर आणि बहुजन मुक्ती पार्टीचे वसंतराव भाऊसाहेब भोसले यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सतीश जगन्नाथ सावंत यांनी शिवसेनेचे दोन, अपक्ष दोन असे चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विजय सूर्यकांत साळसकर यांनी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. 

कुडाळात 10 जण स्पर्धेत 
कुडाळ - मतदारसंघाच्या आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत 10 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज दाखल केले. 
येथे काल व आज या दोन दिवसांच्या कालावधीत निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. येथून सिद्धेश पाटकर यांनी भाजप व अपक्ष, वैभव नाईक यांनी शिवसेनेतर्फे दोन, अतुल काळसेकर यांच्यातर्फे भाजप व अपक्ष, रवींद्र कसालकर (बसप), चेतन मोंडकर (कॉंग्रेस), धीरज परब (मनसे), रणजित देसाई (अपक्ष), बाळकृष्ण जाधव (वंचित बहुजन समाज), विष्णू मोडकर (भाजप व अपक्ष), देवदत्त सामंत (अपक्ष व भाजप) असे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत पोलिस बंदोबस्तात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. 

एबी फॉर्म होता पण... 
कणकवलीतून भाजपने नीतेश राणेंना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने सतीश सावंत यांना त्यांच्या विरोधात उतरण्याची तयारी सुरू केली. यामुळे भाजपकडूनही जोरदार हालचाली झाल्या. त्यांनी सावंतवाडीतून राजन तेली व कुडाळमधून अतुल काळसेकर यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. श्री. तेली हा फॉर्म घेऊन निवडणूक कार्यालयात आले. शिवसेनेने सतीश सावंत यांचा एबी फॉर्म शेवटच्या काही मिनिटांत दाखल केला. काळसेकर आणि तेली हे मात्र फॉर्म दाखल करू शकले नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 30 candidates for three seats in Sindhudurg