Vidhan Sabha 2019 : राजापुरात आघाडीकडून स्थानिक नेतृत्त्व कि कुणबी नेता

राजेंद्र बाईत
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

गेल्या पाच वर्षात तळागाळात संघटना बांधणी करणारे आणि कोणतेही पद नसताना देखील स्वनिधीतून विकासकामे करणारे स्थानिक नेतृत्व अजित यशवंतराव आणि कुणबी समाजाचे नेते मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांच्यामध्ये विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये "कॉंटे की टक्कर' आहे. 

राजापूर - राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना - भाजप युतीकडून उमेदवारी जाहिर झालेली आहे. मात्र, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीसह सेनेचे प्रमुख राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारीचे त्रांगडे अद्यापही सुटलेले नाही. मात्र, गेल्या पाच वर्षात तळागाळात संघटना बांधणी करणारे आणि कोणतेही पद नसताना देखील स्वनिधीतून विकासकामे करणारे स्थानिक नेतृत्व अजित यशवंतराव आणि कुणबी समाजाचे नेते मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांच्यामध्ये विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये "कॉंटे की टक्कर' आहे. 

राजापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेसह भाजप कॉंग्रेस, राष्ट्रवादी आदी राजकीय पक्षांची चांगलीच ताकद आहे. अशा स्थितीतही यावेळी शिवसेना - भाजप युती विरुध्द  कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी अशी लढत होण्याची शक्‍यता आहे. त्यातून, युतीची उमेदवारी जाहिर झालेली असताना मात्र, आघाडीकडून अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. आघाडीकडून सध्या श्री. यशवंतराव आणि श्री. लाड यांची नावे आघाडीवर आहेत. 

लांजा तालुक्‍यातील श्री यशवंतराव यांनी गतनिवडणूकीत पराभूत झाल्यानंतरही मतदारसंघाशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले. कोणतेही प्रमुख लाभाचे पद नसताना त्यांनी स्वतःच्या खिशाला चाट देऊन अनेक विकासकामे केली. त्यातच, रिफायनरी प्रकल्पासह विविध प्रकारच्या स्थानिक मुद्दा वा समस्येवर आवाज उठविला आहे. त्यातच, स्थानिक पातळीवर ग्रामपचायतीवर वर्चस्व मिळविताना राजापूर - लांजा पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या चार जागांसह जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची प्रत्येकी एक अशा दोन जागा राखण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होणार आहे. 

तर, दुसऱ्या बाजूला संगमेश्वर तालुक्‍यातील श्री. लाड यांनीही गेल्या काही वर्षांमध्ये मतदारसंघाशी संपर्क वाढविला आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाचे वर्चस्व असून उमेदवार म्हणून समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी केली जात आहे. त्यातच, सामाजिक, शैक्षणिक विकासामध्ये त्यांचे योगदान राहिले आहे. रिफायनरी आंदोलनामध्ये त्यांनी लोकांसोबत राहून प्रकल्पविरोधी आवाज उठविला. त्याचा श्री लाड यांना लाभ होणार आहे. या दोन्ही इच्छुकांच्या असलेल्या वरचढ बाजूमुळे कॉंग्रेसकडून उमेदवार म्हणून नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे सारयाचे लक्ष लागून राहिले आहे. 

""गेली सुमारे साडेचार वर्ष अजित यशवंतराव यांनी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेवून मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यातच, संघटनात्मक मोर्चेबांधणीही केली आहे. त्यातून आघाडीचे विरोधकांसमोंर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे विधानसभेची अजित यशवंतराव यांना उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. मात्र, कॉंग्रेसमधील काही स्वयंघोषित नेत्यांकडून त्यांच्या आजारपणाचा बाऊ करीत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. यामध्ये श्री. यशवंतराव यांना उमेदवारी न मिळाल्यास कॉंग्रेसचे निष्ठावान आणि जुनेजाणते कार्यकर्ते आपली ताकद साऱ्यांना दाखवून देतील. त्याचा निश्‍चितच फटका पक्षाला बसेल याची पक्षनेतृत्वाने नोंद घ्यावी. '' 

- मनोहर सप्रे, प्रवक्ते, राजापूर तालुका काँग्रेस, 
संचालक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Ajit Yashwantrao or Avinash Lad in Rajapur from congress