Vidhan Sabha 2019 : ...तर गुहागरात भाजपचा धनुष्याला विरोध

सिद्धेश परशेट्ये
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

खेड - जनसंघापासून असलेला गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. तो मिळाला नाही तर गुहागर मतदारसंघात सेनेच्या धनुष्याला भाजपच्या कमळाची साथ मिळणार नाही, अशी भाषा दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांमध्ये दबक्‍या आवाजात सुरू आहे.

खेड - जनसंघापासून असलेला गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. तो मिळाला नाही तर गुहागर मतदारसंघात सेनेच्या धनुष्याला भाजपच्या कमळाची साथ मिळणार नाही, अशी भाषा दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांमध्ये दबक्‍या आवाजात सुरू आहे.

गुहागर भाजपचा बालेकिल्ला आहे. २००९ मध्ये खेड मतदारसंघाचे विभाजन गुहागर आणि दापोली मतदारसंघात करण्यात आले. त्यामुळे रामदास कदम यांच्यासाठी भाजपने हा मतदारसंघ सोडला होता. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बंड केले. तत्कालीन आमदार विनय नातू यांनी श्रीरंग सेनेच्या माध्यमातून त्यावेळची विधानसभा लढवली. त्यावेळी थोड्याच मतांनी कदम यांचा पराभव झाला अन्‌ हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला.

परंतु भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केल्याने हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला. या वेळी नातू यांनी चांगली बांधणी केली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासह संपूर्ण मतदारसंघात शक्तिकेंद्रप्रमुख नेमले आहेत. नुकत्याच झालेल्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी मार्गदर्शन केले. 

नुकत्याच रत्नागिरी येथे झालेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी आपला विनय नातू यांना आशीर्वाद आहे का? असा प्रश्‍न उपस्थित जनसमुदायाला करून नातूंना उमेदवारी देण्याचे संकेत दिले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. अशा परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला मिळाला नाही, तर भाजपचा तळागाळातील कार्यकर्ता हा युतीचा धर्म पाळणार की नाही, हा कळीचा मुद्दा आहे. 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावा-गावात, वाड्यावस्त्यांवर बैठका घेण्यास सुरवात केली आहे. ज्या उमेदवाराच्या विरोधात गेली अनेक वर्षे काम केले, त्याच्याच बाजूने या वेळी युतीचा धर्म म्हणून काम कसे करायचे, या कोड्यात कार्यकर्ते अडकलेत. 

नेत्यांची भाषा वेगळी
या संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘‘आमच्या पक्षाचे काम तळागाळात सुरू आहे. पक्ष बांधणीच्या माध्यमातून नातू यांचे कोकणात मोठे योगदान आहे. त्यांना उमेदवारी मिळावी ही आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाल्यास आम्ही युतीधर्म पाळू.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 BJP will Oppose to Shivsena in Guhagar