Vidhan Sabha 2019 :  कुणबी मते टिकविण्याचे दोन्ही कदमांपुढे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

गावतळे - भाजप हा सेनेचा पारंपरिक मित्रपक्ष, मात्र 2016 च्या दापोली नगरपंचायत निवडणुकीत त्रिशंकू निकालाच्या परिस्थितीत सेना - भाजप युती होणे अपेक्षित होते; मात्र पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपला दूर ठेवत भाई जगताप यांना बरोबर घेत काँग्रेसबरोबर प्रासंगिक करार केला व सत्ता मिळविली. आता हीच खेळी सेनेला भारी पडत आहे. आपल्याकडील कुणबी समाजाची मते टिकविणे हेही दोन्ही कदमांपुढे आव्हान आहे. 

दापोली मतदारसंघात 11 उमेदवार आहेत; मात्र मुख्य लढत राष्ट्रवादीचे संजय कदम विरुद्ध सेनेचे योगेश कदम यांच्यातच होणार आहे. भाजपला प्रासंगिक कराराचा खूप राग आहे. त्यामुळे जरी भाजपच्या केदार साठे यांनी अर्ज मागे घेतला तरीही भाजप सेनेलाच मतदान करतील याची खात्री देता येत नाही. ही मते मिळविण्यासाठी रामदास कदम यांना बरीच कसरत करावी लागेल. मात्र ही मते सेनेला न मिळाल्यास योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

भाजपच्या म्हणण्यानुसार ही मते 20 हजारपेक्षाही जास्त आहेत. सूर्यकांत दळवी हे सेनेकडून 1990 पासून 2009 पर्यंत सतत 5 वेळा निवडून आलेले आमदार. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार दिला आणि कुणबी समाजाने शशिकांत धाडवे यांना उभे केल्याने मतविभाजन होऊन सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला.

या पराभवामागे रामदास कदम यांचा हात आहे, असा आरोप दळवी यांनी केला. पुढे रामदास कदम व दळवी यांच्यात मतभेद वाढत गेले. आरोप-प्रत्यारोप झाले. आता या निवडणुकीत दळवी कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता पूर्ण तालुक्‍याला आहे. दळवी यांना मानणारा एक गट मतदारसंघात आहे. 

कुणबी मतदार 65 टक्के आहेत. समाजाचा आमदार 1990 पासून झाला नाही, याबद्दल समाजात नाराजी आहे. 2014 साली धाडवे यांनी समाजाची ताकद दाखविली होती. यावेळीही कुणबी समाजाचा उमेदवार सुवर्णा पाटील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी कुणबी महिलांचा मेळावा घेऊन वातावरणनिर्मिती केली. 2014 ची पुनरावृत्ती झाली, तर याचा फटका दोन्ही कदमांना बसू शकतो. कुणबी समाज गेल्या साडेचार वर्षांत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीकडे झुकताना दिसत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Dapoli constituency special report