Vidha Sabha 2019 : सहदेव बेटकर यांच्या उमेदवारीचा पत्ता होणार कट ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

संगमेश्‍वर - गुहागरमधून इच्छुक असलेले व गेले वर्षभर तयारी करणारे शिवसेनेचे विद्यमान शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांच्या उमेदवारीचा पत्ता कट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे बेटकर हे याच मतदारसंघातून कुणबी समाजातर्फे लढण्याची दाट शक्‍यता आहे. तसे झाल्यास शिवसेनेप्रमाणेच भाजपलाही याचा मोठा फटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संगमेश्‍वर - गुहागरमधून इच्छुक असलेले व गेले वर्षभर तयारी करणारे शिवसेनेचे विद्यमान शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांच्या उमेदवारीचा पत्ता कट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे बेटकर हे याच मतदारसंघातून कुणबी समाजातर्फे लढण्याची दाट शक्‍यता आहे. तसे झाल्यास शिवसेनेप्रमाणेच भाजपलाही याचा मोठा फटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेनेचे खंदे पदाधिकारी असलेले सहदेव बेटकर यांना गुहागरमधून तयारी करा, असे आदेश वर्षभरापूर्वीच देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी मतदारसंघात फिरत प्रथम कुणबी समाजाची निर्णायक मते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. गुहागरात ६५ टक्‍के मतदार कुणबी असून, त्यातील ५० टक्‍के शिवसेनेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हाच धागा पकडून जिल्ह्यातील एकतरी उमेदवार कुणबी असावा, याकरिता बेटकर यांचे नाव पुढे करण्यात आले होते. आता मात्र गुहागरमधील राजकीय चित्र बदलणार आहे.

गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी गुहागरमधून इच्छुक असल्याचे जाहीर केल्याने आता बेटकरांसमोर पेच निर्माण झाला. गुहागरचे राजकीय चित्र बदलत असतानाच राष्ट्रवादीकडून बेटकर यांना ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले संबंध पाहता बेटकर पक्षांतर करण्याची शक्‍यता नाही.

याबाबत बेटकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या खेडमधील निवासस्थानी पर्यावरणमंत्री रामदास कदम, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार राजन साळवी यांच्यात एकमत होऊन गुहागरमधून कुणबी उमेदवारालाच संधी देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यासाठी या सर्वांनी तुम्ही तयारीला लागा, असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही गेले वर्षभर याची तयारी करीत आहोत, असे सांगितले. सभापतिपदाच्या माध्यमातून गुहागरमधील विकासकामांसाठी बेटकर यांनी भरीव निधी दिला आहे. लोकसभा निवडणुकीलाही ते या मतदारसंघात गावागावांत फिरत होते.

दरम्यानच्या काळात उमेदवारीसाठी ते पक्षप्रमुखांनाही भेटले होते. त्यामुळे युती न झाल्यास सेनेकडून त्यांचे नाव निश्‍चित होते. 

गुहागर मतदारसंघातून कुणबी व बहुजन समाजाला संधी मिळावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्‍त केली आहे. या समाजावरच येथील विजय अवलंबून आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यास पक्षांतराचा विचार नाही. मात्र, समाजाची मते घेऊन समाज देईल, तो निर्णय मान्य असेल.
- सहदेव बेटकर,
शिक्षण सभापती, रत्नागिरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 issue of Sahadev Betkar candidature