Vidhan Sabha 2019 : रत्नागिरीत पाचही जागांवर शिवसेनेचे उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

रत्नागिरी/दाभोळ - घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागांवर शिवसेना उमेदवार उभे करणार आहे. दापोली विधानसभेसाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम, चिपळुणातून सदानंद चव्हाण, गुहागरमधून शिवसेनेत दाखल झालेले भास्कर जाधव, राजापुरातून राजन साळवी, तर रत्नागिरीतून उदय सामंत यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मही देण्यात आला.

दापोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेना व भाजप या दोघांनीही दावा केला होता, तर शिवसेनेतून योगेश कदम, संदीप राजपुरे व सुनील भागणे हे तीनजण इच्छुक होते. या तिघांनीही उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखत दिली. कुणबी उमेदवार द्यावा अशी मागणी कुणबी समाजातर्फे करण्यात आली होती.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दापोलीतून योगेश कदमांच्या नावाची घोषणा केली असून ए बी फॉर्मही दिला आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदारांना तिकीट देण्यावर पूर्वीच निर्णय घेतला होता; मात्र गुहागरचे आमदार जाधव यांनी शिवसेना प्रवेश केल्यानंतर ते चिपळूणमधून उभे राहतील की काय अशी शक्‍यता वर्तवली होती. पण ती मावळली असून आमदार चव्हाण यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

राजापूर तालुक्‍यात विरोधी गटाकडून साळवी यांना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी पत्रकार परिषदही घेतली. गेले चार दिवस सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राजापुरातील उमेदवारीकडे लक्ष लागले होते. पण विरोधी गटापेक्षा समर्थक गटाने सह्यांचे पत्र वरिष्ठांकडे पाठविले होते. विरोधकांकडून आरोप होत असताना आमदार साळवी यांच्यासह समर्थकांनी कोणतीही पत्रकबाजी केली नव्हती. मात्र रविवारी घटस्थापनच्या मुहूर्तावर साळवींच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब झाले. रत्नागिरीतून आमदार उदय सामंत यांना एबी फॉर्म देण्यात आला.

जिल्ह्यात भाजपला एकही जागा नाही

भाजपकडून पारंपरिक गुहागर मतदारसंघावर दावा केला होता; परंतु शिवसेनेकडून यादीच जाहीर झाल्यामुळे जिल्ह्यात भाजपला विधानसभा निवडणुकीत स्थानच राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जागा वाटपावरून तिढा निर्माण होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Shiv Sena candidate in all five seats in Ratnagiri