Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात विद्यमान आमदारांसमोर बंडखोरांचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

ओरोस - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असताना युती किंवा आघाडीकडून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु जिल्ह्याच्या राजकारणात पडद्याआडून सुरू असलेले राजकारण व राजकीय डावपेचाचा विचार केल्यास जिल्ह्यात विद्यमान आमदारांसमोर युतीच्या बंडखोरांचे आव्हान राहण्याची चिन्हे आहेत. 

ओरोस - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असताना युती किंवा आघाडीकडून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु जिल्ह्याच्या राजकारणात पडद्याआडून सुरू असलेले राजकारण व राजकीय डावपेचाचा विचार केल्यास जिल्ह्यात विद्यमान आमदारांसमोर युतीच्या बंडखोरांचे आव्हान राहण्याची चिन्हे आहेत. 

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून सावंतवाडी व कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार कार्यरत आहेत. तर कणकवली मतदारसंघात काँग्रेसकडून निवडून आलेले आमदार होते. त्यांनी कालच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर खासदार शिवसेनेचे आहेत; मात्र जिल्हा परिषद, चार नगर परिषद, तीन पंचायत समिती खासदार नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाकडे आहेत. तर तीन नगरपालिका, दोन पंचायत समिती शिवसेनेकडे आहेत.

भाजपकडे दोन पंचायत समिती, एक नगरपालिका आहे. तर ग्रामपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, शिवसेना, भाजपची संमिश्र सत्ता आहे. विद्यमान आमदार असलेल्या सावंतवाडी येथून दीपक केसरकर, कुडाळमधून वैभव नाईक यांनाच शिवसेनेने पुन्हा उमेदवारी जाहीर करीत एबी फॉर्म दिले आहेत. तर आमदार नितेश राणे यांना कणकवलीमधून भाजपने उमेदवारी जाहीर केल्यात जमा आहे. यातील कोणीही अद्याप उमेदवारी दाखल केलेली नाही. 

माजी मुख्यमंत्री राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जिल्ह्यात तीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती घट्ट असतानाही तुल्यबळ मते घेतली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सक्षम विरोधी पक्ष म्हणून हा पक्ष गणला जात होता; परंतु खासदार राणे यांनी पक्षच भाजपमध्ये विलीन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्याने सत्ताधारी युती विरोधातील हा विरोध मावळला आहे; मात्र युती विरोधातील सक्षम विरोध मावळला तरी युतीतच एकमेकांना विरोध सुरू झाला आहे.

शिवसेना उमेदवार असलेल्या सावंतवाडी मतदारसंघात भाजपच्या राजन तेली यांनी बंडखोरीची पूर्ण तयारी केली आहे. तेली यांच्या बंडखोरीला "स्वाभिमान'ची साथ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे दुसरे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात "स्वाभिमान'चे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी दंड थोपटले आहेत. त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

कणकवलीत राणेंविरोधात सावंत? 
भाजपकडून तिकीट मिळण्याची दाट शक्‍यता असलेल्या नितेश राणे यांच्या विरोधात त्यांच्या जवळचे असलेले जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांना उतरविण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू असल्याचे राजकीय पटलावर बोलले जात आहे. सावंतवाडीत बंडखोरीच्या हालचाली सुरू करताच शिवसेनेने कणकवलीत उमेदवार देण्याचे संकेत आहेत. 

विद्यमान आमदारांपुढे आव्हान 
नितेश राणे यांच्या विरोधात कणकवलीत शिवसेना उमेदवार उभा करण्याची शक्‍यता असतानाच कुडाळमध्ये खासदार नारायण राणे यांनी उमेदवार उभा करण्याची खेळी केल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यमान तिन्ही आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत; मात्र या तिन्ही आमदारांची युतीतील बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढणार हे निश्‍चित.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Sidhudurg special report