Vidhan Sabha 2019 : नारायण राणेंचे शिवसेनेशी जुळवून घेण्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

कुडाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे त्यांनी आज येथे स्पष्ट केले. असे असले तरी सिंधुदुर्गात लढती मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशाच होत आहेत. 

कुडाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे त्यांनी आज येथे स्पष्ट केले. असे असले तरी सिंधुदुर्गात लढती मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशाच होत आहेत. 

शिवसेना आणि राणे यांच्यातील राजकीय कटुता सर्वश्रुत आहेच; मात्र आता राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. भाजपने नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या विरोधात सतीश सावंत यांना एबी फॉर्म दिला. ही लढत आता चुरशीची झाली आहे. याआधीही राणेंनी शिवसेनेने निमंत्रण दिल्यास युती असल्याने उद्धव ठाकरेंच्या सभेला जायची तयारी दाखवली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५ ला राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे यांनी शिवसेनेशी असलेली कटुता संपवावी, असा सल्ला आपण त्यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर येथे अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन राणेंच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना विचारले असता, मी नम्र आहे. शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे राणे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘कुडाळ मतदारसंघात उमेदवार रणजित देसाई तीस हजारांच्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होतील. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष निश्‍चितच निवडणूक संपली की संपवणार आहेत. त्यांनी अगोदरच अध्यक्षपदावरून दूर जावे. आम्ही कोणत्याही धमकीला भीक घालत नाही. आजपासून कोणताही जिल्हा बॅंकेचा कर्मचारी हा प्रचारात दिसणार नाही, अशा प्रकारची कारवाई काल पोलिसांमार्फत करण्यात आली आहे.’’

या वेळी ॲड संग्राम देसाई, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, ॲड. चारुदत्त देसाई, संध्या तेरसे, बंड्या मांडकुलकर, प्रकाश मोर्ये, दिनेश साळगावकर, उषा आठल्ये, विनायक राणे, राजू राऊळ, राकेश कांदे, रुपेश कानडे, आबा धडाम, चेतन धुरी, मिलिंद नाईक, राजू बक्षी, अंकुश जाधव, सुनील बांदेकर, पप्या तवटे, दाजी गोलम, गुरू देसाई, राजेश पडते, विजय कांबळी, बंड्या सावंत, अर्चना पाटील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

काय म्हणाले मुख्यमंत्री?
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कणकवलीतील राजकीय चुरशीबाबत वक्‍तव्य केले. ते म्हणाले, ‘‘१५ ऑक्‍टोबरच्या सभेला मी जाणार आहे. कणकवलीची जागा भाजपला मिळाली होती; पण शिवसेनेने तिथे बी फॉर्म दिला. त्यांचा उमेदवार तेथे उभा आहे. आमचे नीतेश राणे उमेदवारही उभे आहे. त्यांच्या प्रचाराकरिता मी जाईन. पण माझी लढाई शिवसेनेशी नाही. त्यामुळे मी एक शब्द शिवसेनेवर बोलणार नाही. एक शब्द शिवसेनेच्या उमेदवारावर बोलणार नाही. माझी जागा निवडून येतेय. मला कोणावर टीका करण्याची आवश्‍यकता नाही. नारायण राणे भाजपचे अधिकृत खासदार आहेत. त्यामुळे त्यांना वेगळा प्रवेश देण्याची गरज नव्हती. प्रश्‍न त्यांच्या मुलाच्या प्रवेशाचा होता. त्यांचा प्रवेश कणकवलीत झालेला आहे. शिवसेनेचा विरोध साहजिक आहे. त्याला मी नाकारत नाही. श्री. राणे आणि शिवसेनेत निश्‍चित एक टोकाची लढाई झाली. मी श्री. राणे आणि नीतेश राणे यांनाही सांगितले की, कधीतरी ही कटुता संपवली पाहिजे. शिवसेना प्रमुखांबद्दल तुमच्या मनात श्रध्दा असेल तर किती दिवस ही कटुता घेऊन चालणार आहात. या निवडणुकीत किंवा नंतर शिवसेनेबद्दल उद्धव ठाकरेंबद्‌दल, आदित्य ठाकरेंबद्‌दल वक्‍तव्य करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसे करायची गरज नाही. कारण ती जागा निवडून येतेय.’’

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Signs of Narayan Rane reconciliation with Shiv Sena