Vidhan Sabha 2019 : युतीच्या गणितावर निवडणुकीतील चुरस

Sindhudurg-District
Sindhudurg-District

विधानसभा 2019 : सिंधुदुर्ग हा ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा बालेकिल्ला, या समीकरणाला २०१४ च्या निवडणुकीत सुरूंग लागला. तो पुन्हा काबीज करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानच्या झेंड्याखाली राणे पुन्हा प्रयत्न करतील, तर शिवसेना-भाजप गड अबाधित ठेवण्यासाठी ताकद लावतील.

सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला सिंधुदुर्ग जिल्हा. भाईसाहेब सावंत, एस. एन. देसाई, नारायण राणे आणि आता दीपक केसरकर यांनी कर्तृत्वाने झेप घेतली. यातील माजी मुख्यमंत्री राणे यांच्यासाठी यावेळची निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. 

२००९ मध्ये राणे काँग्रेसमध्ये होते. त्या वेळी कुडाळमधून स्वतः राणे आणि सावंतवाडीतून राष्ट्रवादीकडून दीपक केसरकर जिंकले होते. राणेंच्या बालेकिल्ल्यात कणकवलीत त्यांचे समर्थक रवींद्र फाटक यांचा पराभव करत भाजपचे प्रमोद जठार ३४ मतांनी विजयी झाले होते. येथेच राणेंच्या साम्राज्याला सुरूंग लागणे सुरू झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. नीलेश यांचा दारुण पराभव झाला. पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा शिवसेनेच्या वैभव नाईकांनी पराभव केला.

लोकसभा निवडणुकीवेळी राणेंविरोधात बंड पुकारून शिवसेनेत गेलेल्या केसरकरांनी सावंतवाडीतून मोठा विजय मिळवला. कणकवलीत दुसरे पुत्र नीतेश यांनी मोठा विजय मिळवला. या निवडणुकीनंतर शिवसेना मजबूत झाली; मात्र नंतरच्या पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राणेंनी गड राखला. राणेंनी काँग्रेसशी काडीमोड घेत भाजपशी जवळीक साधताना महाराष्ट्र स्वाभिमानची स्थापना केली. भाजपचे खासदारही झाले; पण याचवेळी शिवसेनेशी शत्रूत्वही जपले. मागील लोकसभा निवडणूक त्यांचे पुत्र डॉ. नीलेश यांनी स्वाभिमानच्याच झेंड्याखाली लढवली; मात्र त्यांचा शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी पराभव केला. सध्या शिवसेनेने जनसंपर्क मोहिमेतून प्रचार सुरू केला आहे. युती न झाल्यास उमेदवारी मिळेल, असे गृहित धरून भाजपमधील इच्छुकही सरसावले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पातळीवर मात्र वातावरण थंडच आहे.

राणेंच्या साम्राज्याला सुरूंग लावण्यात मोठा वाटा उचलणारे दीपक केसरकर यांच्या पराभवासाठी स्वाभिमानच्या हालचाली सुरू आहेत. चारित्र्य आणि जनसंपर्क ही केसरकरांची बलस्थाने आहेत; मात्र मंत्रिपदानंतर त्यांना मतदारसंघात फारसा वेळ देता आलेला नाही. माजी आमदार राजन तेली यांनी भाजपतर्फे मतदारसंघात ताकद उभी केली आहे. युती न झाल्यास ते चांगले आव्हान उभे करू शकतील.

‘स्वाभिमान’तर्फे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब इच्छुक आहेत. त्यांची तालुक्‍यातील संघटनेवर पकड आहे. राष्ट्रवादीने येथून पुणे जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे-परब यांना निरीक्षक म्हणून पाठविले. त्या मूळच्या या मतदारसंघातील आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी शक्‍य आहे.

शिवसेनेकडून सावंतवाडीचे नगराध्यक्ष झालेले बबन साळगावकर यांनी केसरकरांविरोधात अघोषित बंड पुकारलंय. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारीची शक्‍यता आहे. केसरकरांविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत घड्याळ या चिन्हावर साळगावकरांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.

कुडाळ मतदारसंघ शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चांगला बांधलाय. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष स्वाभिमानचे सतीश सावंत, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत इच्छुक आहेत. त्यांची खरी ताकद कणकवली मतदारसंघात आहे; मात्र नीतेश राणेंसाठी ते कुडाळातून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. येथून नारायण राणे रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. अशा वेळी भाजपची भूमिका काय, हाही प्रश्‍न आहे. शिवाय, सामंत आणि सावंतांची समजूत राणेंना काढावी लागेल. गेल्या वेळी भाजपचे बाबा मोंडकर उमेदवार होते. काँग्रेसतर्फे येथून माजी आमदार पुष्पसेन सावंत इच्छुक आहेत.

कणकवलीतून स्वाभिमानची उमेदवारी नीतेश राणेंना असेल. जागावाटपात मतदारसंघ भाजपकडे जातो. त्यांच्यातर्फे अतुल रावराणे, संदेश पारकर इच्छुक आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठारही दावा सांगण्याची शक्‍यता आहे; मात्र सावंतवाडीत जशी केसरकरांना थोपवण्यासाठी स्वाभिमानची मोर्चेबांधणी आहे, तशीच राणेंसाठी येथे शिवसेनेची फिल्डिंग असणार आहे. नीतेश राणेंनी मतदारसंघ मजबूत बांधलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com