esakal | Vidhansabha 2019 : कणकवलीत राणेंच्या विरोधकांसमोर संभ्रमाचे ढग
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhansabha 2019 : कणकवलीत राणेंच्या विरोधकांसमोर संभ्रमाचे ढग

कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या विरोधकांमधील संभ्रमाचे धुके अधिक गडद झाले आहे.

Vidhansabha 2019 : कणकवलीत राणेंच्या विरोधकांसमोर संभ्रमाचे ढग

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या विरोधकांमधील संभ्रमाचे धुके अधिक गडद झाले आहे.

सिंधुदुर्गाच्या राजकारणात राणेंचे आगमन झाल्यापासून कणकवलीने त्यांना भक्‍कम साथ दिली. पूर्वी हा मतदारसंघ कणकवली - मालवणपुरता मर्यादित होता. एक काळ असा होता, जेव्हा राणेंची गेल्या टर्मपेक्षा जास्त मताधिक्‍य घेण्याची स्वतःशीच स्पर्धा असायची. पुनर्रचनेनंतर देवगड मतदारसंघ इतिहास जमा झाला. कणकवली, वैभववाडी, देवगड तालुके मिळून नवा कणकवली विधानसभा मतदारसंघ बनला. पुनर्रचनेनंतर २००९ ला झालेल्या पहिल्याच निवडणुकीत या मतदारसंघाने राणेंना अनपेक्षित धक्‍का दिला.

यावेळी राणेसमर्थक रवींद्र फाटक काँग्रेसतर्फे लढले. त्यांचा अनपेक्षितरीत्या भाजपचे प्रमोद जठार यांनी पराभव केला. अंतर्गत नाराजीचा फटका फाटक यांना पर्यायाने राणेंना बसला. २०१४ हे वर्ष राणेंसाठी निराशाजनक होते. लोकसभेत डॉ. नीलेश राणेंचा व विधानसभेत कुडाळमधून स्वतः राणेंचा पराभव झाला; पण यावेळी कणकवलीने राणेंना मजबूत साथ दिली. या लढतीत नीतेश राणे यांनी तब्बल २५ हजार ९७९ इतक्‍या मताधिक्‍याने विजय मिळवला. सगळीकडे काँग्रेसचे पानिपत झाले असताना ‘हात’ या निशाणीवर राणेंना मिळालेली मते त्यांचा येथे किती भक्‍कम पाया आहे, हेच स्पष्ट करतात.

२०१९ च्या निवडणुकीत एकटे नीतेश राणे सोडले, तर दुसऱ्या कोणत्याच पक्षाचा उमेदवार अद्याप निश्‍चित नाही. आमदार राणे यांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. मतदारसंघातील नेटवर्क, राणेंची पारंपरिक व्होट बॅंक या जमेच्या बाजूच्या जोरावर संपर्क मोहीम सुरू केली आहे. या मतदारसंघातील कणकवली तालुक्‍यात राणेंची स्थिती आजच्या घडीला मजबूत आहे. काही भागात विशेषतः कणकवलीच्या पूर्व भागात जवळपास ७० टक्‍क्‍यांपर्यंतची मते आतापर्यंत राणेंच्या बाजूने राहिली आहेत. वैभववाडी आणि देवगडमध्ये तशी स्वाभिमान आणि भाजप या दोन्ही पक्षांना समान संधी आहे; पण आजच्या घडीला राणेंची पकड मजबूत आहे.

युतीच्या जागा वाटपात येथे भाजपचा दावा आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी विधानसभा लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर आणि भाजपचे नेते अतुल रावराणे यांच्यात उमेदवारीसाठी मुख्य स्पर्धा आहे. दोघांनीही आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे; मात्र उमेदवारी निश्‍चित नसल्याने त्यांच्या पातळीवरही संभ्रम आहे. युती झाली नाही, तर शिवसेनेला येथून उमेदवार द्यावा लागणार आहे; गेल्या लढतीत ऐनवेळी सुभाष मयेकर यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचे नाव चर्चेत आहे. 

राणे भाजपमध्ये गेले, तर मात्र येथील समीकरणे बदलणार आहेत. येथे मुख्य स्पर्धा राणे आणि भाजप अशीच आहे. नीतेश राणे ‘कमळा’च्या निशाणीवर लढले, तर एकतर्फी लढत होईल अशी वरवर पाहता स्थिती आहे; मात्र भाजपचे सध्या सक्रिय पदाधिकारी त्यांना कितपत साथ देणार हा प्रश्‍न आहे. सध्या राणेंना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी करणारे बहुसंख्य पदाधिकारी याच मतदारसंघातील आहेत.

तरीही या विरोधाच्या तुलनेत राणेंची पकड येथे मजबूत आहे. त्यामुळे या नाराजीचा मताधिक्‍यावर प्रभाव पडू शकतो; विजयावर नाही. राणेंचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व कणकवली भागात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रभाव आहे. ते विधानसभा लढवायला इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. 

एकूणच हा मतदारसंघ राणेंसाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेवर येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या मतदारसंघात सावंत, रावराणे, गोगटे आदी घराण्यांचाही प्रभाव पडत असतो. एखादी भावनिक लाट इथल्या निकालावर प्रभाव टाकू शकते. २००९ च्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला होता. यामुळे इथे जेव्हा लढती ठरतील तेव्हा खरी चुरस स्पष्ट होणार आहे. सध्या तरी आमदार राणेंची मोर्चेबांधणी दमदार पद्धतीने सुरू आहे. विरोधक अद्याप संभ्रमात आहेत.

यांनी केले प्रतिनिधित्व
  १९७२ - देवगड - राजाभाऊ गोविंद मिराशी (काँग्रेस)
  १९७८ - देवगड - वसंत सदाशिव साटम (जनता पक्ष)
  १९८० - देवगड - अमृतराव राणे (काँग्रेस आय)
  १९८५ - देवगड - आप्पासाहेब गोगटे (भाजप)
  १९९० - देवगड - आप्पासाहेब गोगटे (भाजप)
  १९९५ - देवगड - आप्पासाहेब गोगटे (भाजप)
  १९९९ - देवगड - आप्पासाहेब गोगटे (भाजप)
  २००४ - देवगड - ॲड. अजित गोगटे (भाजप)
  २००९ - कणकवली - प्रमोद जठार (भाजप)
  २०१४ - कणकवली - नीतेश राणे (काँग्रेस)

२०१४ चे बलाबल
  अतुल रावराणे (राष्ट्रवादी)    ८१९६
  चंद्रकांत जाधव (बसप)    ८२७
  प्रमोद जठार (भाजप)    ४८७३६
  नीतेश राणे (काँग्रेस)    ७४७१५
  तुळशीदास रावराणे (शेकाप)    १३२६
  सुभाष मयेकर (शिवसेना)    १२८६३
  विजय कु. सावंत (अपक्ष)    ७२१५
  विजय श्री. सावंत (अपक्ष)    ७००

loading image
go to top