Vidhansabha 2019 : सावंतवाडीत नाट्यमय राजकीय घडामोडींची चिन्हे

Vidhansabha 2019 : सावंतवाडीत नाट्यमय राजकीय घडामोडींची चिन्हे

विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. यामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात वेगवान हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समिकरणावर त्याचा प्रभाव पडणार आहे. सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघातील राजकीय चित्र आणि राणे भाजपवासी झाल्यास होणारे संभाव्य बदल याचे चित्र मांडणारी मालिका...

माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपत गेले तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणिते वेगाने बदलणार आहेत. युती तुटली आणि राणेंनी आपली ताकद भाजपचे संभाव्य उमेदवार राजन तेलींच्या मागे उभी केली तर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरील आव्हान अधिक चुरशीचे होणार आहे; मात्र अशा राजकीय स्थितीत काही नाट्यमय पक्षांतरे, राजकीय घडामोडी पहायला मिळण्याची शक्‍यताही आहे.

केसरकरांबद्दल नाराजी वाढली

विधानसभा निवडणूक जवळ येतेय तशी राजकीय गणितेही वेगाने बदलत आहेत. २०१४ च्या विधानसभा लढतीत दीपक केसरकर यांच्या जवळपासही त्यांचे विरोधक नव्हते. या निवडणुकीने केसरकरांना मंत्रिपद मिळाले; पण याच पदामुळे ते मतदारसंघाला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. यामुळे गेल्या पाच वर्षांत त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी वाढली. उलट भाजपचे संभाव्य उमेदवार तेली यांनी सावंतवाडीकडे लक्ष केंद्रित केले. विविध प्रश्‍न मंत्रालय स्तरावर मांडून मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक कार्यकर्ते आणि मतदारांच्या नजरेत आणून दिली. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी मतदारसंघातील संपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला.

असे असले तरी केसरकर यांना मानणारा मतदार अजूनही बऱ्यापैकी टिकून आहे. यामुळे सध्या तरी त्यांचा पराभव होईल, अशी स्थिती नाही. मुत्सद्दी राजकारणात त्यांचा हातखंडा आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी सत्ताधारी म्हणून काम करताना अनेक विरोधकांनाही आपलेसे केले. अगदी निवडणुकीच्या तोंडावर याच राजकीय डावपेचांच्या बळावर ते काही नाट्यमय पक्षप्रवेश घडवून आणण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.
राणेंच्या भाजप प्रवेशाच्या शक्‍यतेमुळे ही राजकीय गणितेही मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्‍यता आहे.

राणे भाजपमध्ये आले अन् युती तुटली तर...

राणे भाजपमध्ये आले व युती झाली नाही तर या मतदारसंघात शत्रू मित्राच्या आणि मित्र शत्रूच्या भूमिकेत दिसण्याची शक्‍यता आहे. श्री. तेली यांनी राणेंना सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश केला होता. आता तेलींची भाजपतर्फे सावंतवाडी मतदारसंघावर एकमेव मजबूत दावेदारी आहे. राणे यांचीही या मतदारसंघात ताकद आहे. त्यांच्या पक्षातर्फे महाराष्ट्र स्वाभिमानचे संजू परब यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात होते. राणेंचा प्रवेश झाल्यास भाजपतर्फे तेली की परब असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. तेलींनी उमेदवारी मिळवली तर राणेंना त्यांच्यामागे आपली राजकीय ताकद लावावी लागणार आहे. अशा स्थितीत परब यांची भूमिकाही महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे; मात्र राणेंनी तेलींसाठी राजकीय वजन वापरले तर ते केसरकरांसाठी मोठे आव्हान उभे करतील इतके नक्की.

राणेंच्या राजकीय साम्राज्याला सुरूंग लावण्यात केसरकर यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना राजकीय शह देण्यात राणे कोणतीही कसर ठेवणार नाहीत; मात्र यासाठी त्याच्यापासून दुरावलेल्या तेलींना साथ देतील का हे मात्र येणारी राजकीय स्थितीच सांगू शकणार आहे. केसरकर हेही या मतदार संघाची नस ओळखून आहेत. यावरचा उतारा म्हणून तेही रणनीती आखतील यात शंका नाही. यातून पुढच्या काही दिवसात शह काटशहाचे राजकारण मोठ्या प्रमाणात रंगण्याची शक्‍यता आहे. 
या बदललत्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादीची काय भूमिका असणार हाही प्रश्‍न आहे.

राष्ट्रवादीकडून साळगावकर यांच्या उमेदवारीची शक्यता

राष्ट्रवादीकडून सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे; मात्र स्वाभिमान, मनसे आणि दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन केसरकर यांना शह देण्याची रणनीती मात्र आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. राणेंनी भाजप प्रवेश केल्यास त्यांना कमळाच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा लागणार आहे.

एकूणच सावंतवाडीची राजकीय गणिते अनपेक्षितरीत्या बदलण्याची शक्‍यता आहे. काही दिग्गज नेते रोज बदलणाऱ्या स्थितीमुळे संभ्रमात आहेत. अनेकांना काय भूमिका घ्यावी याचा अंदाज घेणे मुश्‍कील झाले आहे. कार्यकर्त्यातील संभ्रम तर आणखी वाढला आहे. राणेंच्या संभाव्य प्रवेशाबाबत चित्र स्पष्ट झाल्यानंतर या मतदारसंघात राजकीय हालचाली वेगवान होतील. तोपर्यंत ‘वेट ॲण्ड वॉच’चे चित्र आहे. 

सार्वत्रिक निवडणुकीत विजयी उमेदवार
  १९७२     प्रतापराव देवराव भोसले (काँग्रेस)
  १९७८    जयानंद शिवराम मठकर (जनता दल)
  १९८०    शिवराम सावंत भोसले (काँग्रेस आय)
  १९८५    शिवराम खेम सावंत भोसले (इं.नॅ. काँग्रेस)
  १९९०    प्रवीण प्रतापराव भोसले (काँग्रेस)
  १९९५    प्रवीण प्रतापराव भोसले (इं.नॅ. काँग्रेस)
  १९९९    शिवराम गोपाळ दळवी (शिवसेना)
  २००४    शिवराम गोपाळ दळवी (शिवसेना)
  २००९    दीपक वसंत केसरकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
  २०१४    दीपक वसंत केसरकर (शिवसेना)

२०१४ चे बलाबल
  दीपक केसरकर (शिवसेना)    ७०,७१०
  राजन तेली (भाजपा)    २९,७१०
  बाळा गावडे (काँग्रेस)    २५,३७३
  सुरेश दळवी (राष्ट्रवादी)    ९०२९
  परशुराम उपरकर (मनसे)    ६१२९
  वासुदेव जाधव (बसपा)    ७९०
  अजिंक्‍य गावडे (हिंदू महासभा)    ८८२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com