esakal | मूर्तीमंत साधा माणूस मनोहर पर्रिकर 
sakal

बोलून बातमी शोधा

Vilas Patane Article On Manohar Parikar

गोव्यातील पर्रा या छोट्या गावाने स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री व देशाला अत्यंत सामर्थ्यशाली कर्तव्यदक्ष परंतु साधा वागणारा संरक्षणमंत्री दिला. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला.

मूर्तीमंत साधा माणूस मनोहर पर्रिकर 

sakal_logo
By
विलास पाटणे

मुंबई आयआयटीमधून सन 1970 च्या दशकात इंजिनिअरींगची पदवी घेतलेले गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्रीपत्र भूषविलेले मनोहर पर्रिकर. माझे घरातील भोजन आटोपल्यावर मला म्हणाले. विलास नाचणे रोडवरील माझ्या मित्राच्या शेती अवजाराच्या दुकानात जाताना भेट घ्यावयाची आहे. रात्री दहाची मत्स्यगंधा पकडायची होती. परंतु पर्रिकरांनी त्या शॉपला भेट तर द्यायची होती. पर्रिकरांनी त्या शॉपला भेट तर दिलीच आणि सर्व अवजारांची माहितीवरुन घेतली. अकृत्रिम स्नेह, जिव्हाळा आणि प्रेम याच अनोख दर्शन होत. आज पर्रिकरांचा प्रथम स्मृतीदिन. यानिमित्त.... 

गोव्यातील पर्रा या छोट्या गावाने स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री व देशाला अत्यंत सामर्थ्यशाली कर्तव्यदक्ष परंतु साधा वागणारा संरक्षणमंत्री दिला. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला. गोवा राज्याचा आर्थिक विकास दर सातत्याने 12 टक्के वर नेवून ठेविला. पर्रिकर नेहमी म्हणत असत गोव्याची स्पर्धा भारतातील राज्यांशी नसून जगातील प्रगत राष्ट्रांशी आहे. ना खाऊंगा, ना खाने दुँगा या चळवळीचे पर्रिकर खरेखरे प्रवक्ते होते. गोव्याला खाणीच्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या राजकारणातून आणि संरक्षण खात्यामधील शस्त्रात्र खरेदीच्या स्कॅममधून पर्रिकरांनी देशाला बाहेर काढले. 

पर्रिकर मंत्री म्हणून शपथविधीसाठी दिल्लीत गेल्यावर हॉटेलबाहेर एका रिक्षातून स्वतःची बॅग स्वतःच उचलणाऱ्या, साधा हाफ शर्ट व चप्पल परिधान करणाऱ्या, कोणत्याही संरक्षणाशिवाय आलेल्या नव्या संरक्षण मंत्र्याला पाहून अक्षरश: सर्व थक्क झाले. संरक्षणमंत्री म्हणून पहिल्या दिवशी त्यांना कापरं भरलं होतं. मिलीटरीमधील रॅंकचा त्यांना काहीच पत्ता नव्हता. परंतु दिनांक 3 ऑक्‍टोबर 2016 रोजी एल. ओ. सी. ओलांडून आपल्या लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यावर देशाने लष्कराची व त्यांची कौतुकाने पाठ थोपटली. संरक्षणमंत्री म्हणून काम करत असताना खरेदीच्या भ्रष्टाचारात रुतलेलं संरक्षण खातं रुळावर आणलं. 

साधेपणा पर्रिकरांच्या रक्तात होता. त्यांना व्हीआयपी कल्चर, डामडौल, अभिनिवेश बिलकूल आवडत नाही. आपण सामान्य माणसांचे प्रतिनिधीत्व करतो याच भान पर्रिकरांना कायम असे. टपरीवर चहा पित गप्पा मारणे, स्कूटरवरुन फिश मार्केटला जाणे, सर्वसाधारण हॉटेलमध्ये चारचौघांसारखं मिसळ खाणे, लग्नाच्या, जेवणाच्या पंक्तीमध्ये उभे राहणे, यामध्ये त्यांच्या वागण्यातील सहजपणा तसेच जनतेच्या बांधीलकीचा विचार डोकावत असतो. इकॉनॉमी क्‍लासने प्रवास करण्याबरोबर सायकल हा त्यांच्या आवडीचा विषय होता. रत्नागिरीत येण्यापूर्वीच मला मासे खायचे आहेत, असे बजावले होते. त्याप्रमाणे ते माझ्या घरी आले. 2/3 तास आनंदाने, कौटुंबिक जिव्हाळ्याने, प्रेमाने वावरले; उमाळ्याने बोलले. आम्ही सारेच भारावून गेलो. एका अनौपचारिक आनंदाच्या मैफलीत न्हाऊन गेलो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेची चाहूल या देशात पहिल्यांदा कोणाला लागली असेल ती मनोहर पर्रिकरांना. भारतीय जनता पक्षाच्या गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीत पर्रिकरांनी जाहीरपणाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचे नाव सुचविले. नंतर मोदींनी पर्रिकरांना संरक्षणमंत्री म्हणून बढती दिली. परंतु त्यांचे मन दिल्लीच्या राजकारणात कधीच रमले नाही. चारित्र्य आणि सभ्यता याचे सारेच दीप मंदावत चालले असताना पर्रिकरांची आठवण येतच राहते.