रत्नागिरी जिल्हा परिषद आढावा बैठकीत 'ही' चुक आली समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Village Population Number Mistake In Tanda Vasti Planning Ratnagiri Marathi News

समाजकल्याण समिती सभापती ऋतुजा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तांडा वस्ती सुधार योजनेच्या 2018 - 19 ते 2022 - 23 पंचवार्षिक बृहतआराखड्याला मान्यता देण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते.

रत्नागिरी जिल्हा परिषद आढावा बैठकीत 'ही' चुक आली समोर

रत्नागिरी - वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या पंचवार्षिक आराखड्यात समाविष्ट गावांची लोकसंख्या चुकीची मांडल्याचा धक्‍कादायक प्रकार जिल्हा परिषद समाजकल्याणकडून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पुढे आला आहे. त्यामुळे अधिकच्या निधीला जिल्हा मुकणार आहे. संतोष थेराडे यांनी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाला याची जाण करून देतानाच सुधारित आराखडा करण्याची गरज असल्याचे दाखवून दिले. 

समाजकल्याण समिती सभापती ऋतुजा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तांडा वस्ती सुधार योजनेच्या 2018 - 19 ते 2022 - 23 पंचवार्षिक बृहतआराखड्याला मान्यता देण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते. संतोष थेराडे, दीपक नागले, पूजा नामे, मुग्धा जागुष्टे, दीप्ती महाडिक, सुनील तोडणकर, श्री. पुजारी आणि राज्य समाजकल्याणचे अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील तांडा वस्तींमध्ये रस्ते, पाणी योजना, विद्युतीकरण, शौचालये, समाजमंदिर, वाचनालय आणि मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे घेता येतात. त्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडून मागविण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्याचा 32 कोटी 27 लाखाचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात 695 गावात तांडा वस्ती असून 79 हजार 938 लोकसंख्या आहे. 

संगमेश्‍वर तालुक्‍यातील कुंभारखणी, धामणी या गावांची लोकसंख्याच चुकीची दर्शविली आहे. ही बाबत थेराडे यांनी बैठकीत पुढे आणली. याचे आराखडे लोकसंख्येनुसार ठरवले जातात. त्यामुळे जिल्ह्याला मिळणारा निधी कमी येणार आहे. ही लोकसंख्या ग्रामसेवकांकडून पंचायत समितीला येते. तांडा वस्तीचा आराखडा तयार केल्यानंतर राज्य समाजकल्याणकडून तो सदस्यांना माहितीसाठी दिला नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

समाजकल्याण अधिकारी एस. एस. चिकणे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर सुधारित आराखडा बनवण्याचे ठरले. ज्या अधिकाऱ्यांनी या चुका केल्या आहेत, त्याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हे लवकरच घेणार आहेत. चुकीच्या आकडेवारीचा फटका जिल्ह्याला बसणार असून तांडा वस्तीसाठी मिळणाऱ्या निधीत फरक पडणार असल्याची खंत थेराडे यांनी व्यक्‍त केली. 

तांडा वस्तीसाठीचा आराखडा बनवताना वेळीच खबरदारी घेणे आवश्‍यक होते. तो शासनाकडे पाठविण्यासाठी आठ दिवस शिल्लक आहेत. कमी वेळेत कसरत करावी लागणार आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे हा गोंधळ उडाला आहे. 
- संतोष थेराडे, सदस्य