ग्रामसेवकाला लाखो रुपयांचा अपहार भोवला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

या भ्रष्टाचाराने कुडाळ तालुक्‍यात खळबळ माजली आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच ही कारवाई करण्यात आलेली आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार प्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी निलंबित केले आहे. याबाबत "सकाळ'ने आज वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत डॉ. वसेकर यांनी ही कारवाई केली आहे. 

ग्रामसेवक कसालकर यांनी बांबुळी ग्रामपंचायत चौदाव्या वित्त आयोगातील लाखो रुपयांचा निधी परस्पर हडप केला होता. त्याबाबत तक्रार झाल्यानंतर याची रितसर चौकशी करण्यात आली असून यात लाखोंनी रूपये ग्रामसेवकाने हडप केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत गटविकास अधिकारी स्तरावरून प्राप्त झालेला चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्याकडे कारवाईसाठी सादर करण्यात आला होता. या भ्रष्टाचाराने कुडाळ तालुक्‍यात खळबळ माजली आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच ही कारवाई करण्यात आलेली आहे. 

बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने बांबुळी ग्रामपंचायत चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार कुडाळ गटविकास अधिकारी स्तरावर चौकशी पूर्ण करून त्याचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. या चौकशी अहवालात बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चात अनियमितता आढळली आहे. जबाबदार व्यक्तींनी विकासकामांवर यातील निधी खर्च न करता परस्पर काढल्याचे स्पष्ट झाले होते. 

सरपंचाचे नाव कसे नाही? 
ग्रामपंचायतीचा व्यवहार हा सरपंच व ग्रामसेवकांच्या संयुक्त स्वाक्षरीने चालतो. गटविकास अधिकारीस्तरावर केलेल्या चौकशीत बांबुळी ग्रामसेवकावर या भ्रष्टाचाराची जबाबदारी निश्‍चित केली आहे; परंतु चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाचा धनादेश काढताना सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त स्वाक्षरी आवश्‍यक असते. त्यामुळे या नियमाने ग्रामसेवक सोबत सरपंच सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. तरीही तालुकास्तरावर चौकशी करताना सरपंचांचे नाव नाही कसे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पदभार दुसऱ्याकडे देण्याचे आदेश 
जिल्हा परिषदस्तरावर गटविकास अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर त्यात अनियमितता होती. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने कुडाळ पंचायत समितीला आदेश देत बांबुळी ग्रामपंचायतचे चौदावा वित्त आयोग बॅंक खाते तत्काळ सील करण्याचे सांगितले आहे. आज ग्रामसेवक कसालकर याला निलंबित केल्यानंतर ग्रामपंचायतची सर्व खाती सील करण्याचे तसेच येथील पदभार दुसऱ्या ग्रामसेवकाला देण्याचे आदेश डॉ. वसेकर यांनी दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: village servant corruption bambuli sindhudurg