एमआयडीसीसाठी इंचभर जमीन न देण्याचा वाटद ग्रामस्थांचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - तालुक्‍यातील वाटद येथील जमीन पर्यावरणपूरक किंवा रासायनिक प्रकल्प नव्हे, तर एमआयडीसीलाही द्यायची नाही असा निर्णय घेत वाटद-खंडाळा येथील ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांनी शपथ घेतली. एमआयडीसीबाबत शेतकऱ्यांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. 

रत्नागिरी - तालुक्‍यातील वाटद येथील जमीन पर्यावरणपूरक किंवा रासायनिक प्रकल्प नव्हे, तर एमआयडीसीलाही द्यायची नाही असा निर्णय घेत वाटद-खंडाळा येथील ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांनी शपथ घेतली. एमआयडीसीबाबत शेतकऱ्यांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. 

वाटद एमआयडीसीचा तीव्र निषेध करण्यासाठी रविवारी (ता. 6) कळझोंडी, गडनरळ, वैद्यलागवण, कोळीसरे या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सभा वाटद येथे झाली. या बैठकीला दीपक कुर्टे, सदा वीर, प्रकाश पवार, प्रमोद तांबटकर, प्रकाश धोपट, महेश मोघे, सुयोग आडाव, प्रसाद रहाटे, संतोष बारगुडे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी मते मांडली.

एमआयडीसी हद्दपार करणार, एक इंचही जमीन देणार नाही अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत होत्या. 917 हेक्‍टर म्हणचे साडेतीन हजार एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे. जमिनी गेल्या तर आम्ही वाऱ्यावर येऊ, त्यामुळे शंभर टक्के प्रकल्पाला विरोध असल्याचे जाहीर करण्यात आले.

एमआयडीसीला पाणी कुठून देणार? यात कोणते प्रकल्प आहेत? याची कोणतीच माहिती नाही. जयगड पंचक्रोशी आंब्याच्या गोडव्यासाठी प्रसिद्ध आहे. हा व्यवसाय वाचविण्यासाठी वेळप्रसंगी काटेरी बाणा दाखवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

जनसुनावणी न घेता हा प्रकल्प लादला जातोय. कोकणात अनेक एमआयडीसी उभ्या आहेत, त्यातील अनेक उद्योग बंद आहेत. मिरजोळे एमआयडीसीत शेकडो एकर जागा रिकामी आहे. तिथे कारखाने चालत नाहीत. रोजगाराच्या फक्त थापाच आहेत. जिंदलमध्ये हातावर मोजण्याइतक्‍याही गावातील लोकांना रोजगार नाही.

भैय्यांची भरती करण्यावरच भर दिला. तिथल्या महिलांना एकटे फिरणेही मुश्‍कील झालेय. एमआयडीसींमधील प्रदुषणामुळे इथली हवा, पाणी दूषित होत आहे. "सावध रहा, आपल्या जमिनी विकू नका, आता झोपलात राव तर जाईल आपला गाव', अशी हाक यावेळी देण्यात आली. एक लाखाहून अधिक झाडांची राख करून आम्हाला एमआयडीसी नको, असे मत उमेश रहाटे यांनी व्यक्‍त केले. 

निवडणुकीच्या तोंडावर उठाव 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामस्थांनी वाटद एमआयडीसीला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे याचा फायदा कोणते राजकीय पक्ष उठवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers resolved not to give an inch of land for MIDC