
केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे.
ओरोस- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मंत्री देशमुख यांच्यावर टीका केली आहे. यावेळी खा. राऊत यांनी महाविकास आघाडीत प्रकल्प पळवापळवी होऊ नये. यासाठी वरिष्ठांनी मध्यस्थी करावी. जेणेकरुन समन्वय राहिल, असेही आवाहन राऊत यानी केले आहे. परंतु, या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांटवरुन ठाकरे सरकारमधील समन्वय नसल्याचे पुन्हा समोर आले आहे.
केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे. "आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे, यासंदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी केली. याबाबत जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी काही दिवसांपूर्वी भांडाफोड केली होती. हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हावा, अशी जिल्हावासियांची मागणी आहे.
सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत," अशा शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र, मंत्री देशमुख यांचा हा प्रयत्न हाणून पाडू', असा इशारा खा राऊत यानी दिला. "हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही. आतापर्यंत कोकणाला न्याय मिळत नव्हता. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाला बदलत आहेत.", असे सांगितले.
हे पण वाचा - होय! बंगाली समाज सावरतोय!
मंत्री देशमुख यानी पालकमंत्र्यांना भेट नाकारली
खा. राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर टीकेचे बाण सोडले, तसंच अमित देशमुखांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही, असाही आरोप केला. "अमित देशमुख यांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे. स्वर्गीय विलासराव असते तर अशा घटना घडल्या नसत्या. त्यांचं प्रेम वेगळं होतं, पण अमित देशमुखांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिली नाही. पत्रव्यवहार केले पण उत्तरं दिली नाहीत. पालकमंत्री उदय सामंत यांनाही त्यांनी भेट नाकारली. हे अशोभनीय आहे. अमित देशमुखांनी विलासरावांचे गुण घेतले पाहिजे, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला.
संपादन - धनाजी सुर्वे