'नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका'

मुझफ्फर खान
Monday, 11 January 2021

त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये. असे खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथे सांगितले.

चिपळूण (रत्नागिरी) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलापासूनच आहे. बाकी त्यांना कोणताही धोका नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये. असे खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे सांगितले. आज ते चिपळूण दौर्‍यावर आहेत. 

महाविकास आघाडी सरकारने मनसेप्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राणे यांनी राज्य सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला. 

हेही वाचा - नारायण राणे तुम्ही मातोश्रीवर तीन तीन वेळा  का फोन करत होता ? -

राणेंच्या या इशार्‍याला उत्तर देताना राऊत म्हणाले, नारायण राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे. नारायण राणेंचे राजकारणात वलय आहे. त्यांच्याबद्दल बोलताना आम्ही सुद्धा कधी एकेरी बोलत नाही. पण निलेश राणेंची भाषा असभ्य असते. खर तर राणेंच्या दोन्ही मुलांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी जे लागते ते सर्व उपलब्ध होते. पण दोघांना त्याचा योग्य उपयोग करून घेता आला नाही. निलेश राणेंना मतदारांनी घरी बसविले. नितेश राणेंकडे चांगले गुण असल्यामुळे ते पुढे जाईल असे वाटले होते, परंतू त्यांची बदलती वर्तणूक त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. राणेंना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत. अडीच वर्षासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले असते तर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नसते. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच युती तुटली. यापुढे लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर सोडला असल्याचेही खासदार राऊत यांनी सांगितले. 

हेही वाचा - मी, माझी पत्नी आणि वडील या अपघातामुळे धास्तावलो आहोत

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinayak raut criticized on the narayan rane in chiplun ratnagiri on the topic of security