
कणकवली (सिंधुदूर्ग) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्याचा विकास थांबला असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला.येथील विजय भवन येथे श्री.राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे युवानेते अतुल रावराणे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अॅड.प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह राजू राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री दौर्याच्या पार्श्वभूमिवर राणेंनी केलेल्या आरोपांवर प्रत्यूत्तर देताना श्री. राऊत म्हणाले, “आमचा सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोध नव्हता; मात्र 300 एकर ऐवजी 1300 एकर एवढी जागा घेतली जात असल्याने आम्ही विरोध केला. प्रकल्प 300 एकरात झाल्यानंतर उर्वरीत 1 हजार एकर जागा घशात घालण्याचा राणेंचा डाव होता तो आम्ही उधळून लावला. चिपी येथील विमानतळ पूर्णतः सरकारच्या ताब्यात असायला हवा होता. राणेंनी हा विमानतळ सरकारी-खासगी भागीदारी अंतर्गत खासगी कंपनीकडे दिला. या कंपनीने विमानतळ होण्यासाठी फारशी कार्यवाही केली नाही. त्यामुळे विमानतळाचे काम अजूनही रखडले आहे.”
मुख्यमंत्र्यांमुळे अनेक प्रश्न सुटले
ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौर्यामुळे सिंधुदुर्गातील अनेक प्रश्न सुटले आहेत. यात मसुरे-आंगणेवाडी येथील 23 कोटींच्या लघुसिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मच्छिमारांना गेली चार वर्षे डिझेल परतावा मिळाला नव्हता. हा परतावा पुढील आठवड्यापासून मिळणार आहे. पर्ससीन नेट आणि एलईडी फिशींगबाबत लवकरच अधिवेशनात कायदा होणार आहे. विदर्भाप्रमाणे चक्राकार पद्धतीने आरोग्य, सार्वजनिक बांधकाम व इतर खात्यांमध्ये पदभरती होणार आहे. 1500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरबांधणीचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफीमुळे राज्यातील 35 लाख शेतकर्यांचा सातबारा कोरा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व तलावांमध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन होणार असून यात मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार मिळेल.”