रत्नागिरी : आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा आता प्रत्येक आरटीओत | Ratnagiri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी : आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा आता प्रत्येक आरटीओत!

रत्नागिरी : आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा आता प्रत्येक आरटीओत!

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : वाहन चालवण्याचा कायम परवाना मिळवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी नवीन यंत्रणा आरटीओ कार्यालयात लवकरच बसवण्यात येणार आहे. सिम्युलेटर म्हणजे संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा, असे त्याचे नाव आहे. प्रत्येक आरटीओ कार्यालयात ती बसवण्यात येणार आहे. परवानाधारकाची वाहनावर प्रत्यक्ष चाचणी होणारच. त्यासह सिम्युलेटरची चाचणी होणार आहे; मात्र ती सक्तीची नाही. चढावात, गर्दीच्या ठिकाणी, तीव्र उतारात वाहन चालवण्याचा आत्मविश्वास यातून मिळणार आहे. या यंत्रणेमुळे अपघातांवर नियंत्रण मिळवण्याचा परिवहन खात्याला विश्वास आहे.

परिवहन खात्याने राज्यभारातील प्रादेशिक, उपप्रादेशिक परिहवन कार्यालयात (आरटीओ), ६५ सिम्युलेटर (संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा) लावण्यासाठी रस्ता सुरक्षा निधीतून ३ कोटी ९० लाखाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सुमारे १५ प्रादेशिक परिवहन कार्यालय तर ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यापैकी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्येकी २ तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्येकी १ सिम्युलेटर लावण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने जागा निश्चित करण्यासह संबंधित संस्थेला सर्व मदत करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यानंतर मशिन बंद पडले. ते अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक आरटीओ कार्यालयात हे सिम्युलेटर लागल्यावर त्यात काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास ती तातडीने दूर करण्यासाठी परिवहन खात्याकडून खबरदारी घेतली जाणार आहे.

सिम्युलेटर चाचणीमुळे परीक्षेचा वेग वाढणार

सध्या एका उमेदवाराच्या वाहन चालवण्याच्या परीक्षेसाठी ४ ते ५ मिनिटाचा वेळ दिला जातो. परंतु सिम्युलेटर चाचणीमुळे हा वेळ वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दिवसाला सुमारे १५० परवाने दिले जातात. त्यामध्ये वाढ होईल की घट, याकडे सर्वांचे लक्ष आहे. यंत्रणा बसवण्यासाठी आवश्यक असलेली जागा आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंधरा दिवसांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

"परवानाधारकांना त्यांच्यामध्ये ड्रायव्हिंगचे कौशल्य किती आहे. गर्दी, चढाव, उतार वाहन चालवता येते का, याचे परीक्षण या सिम्युलेटरवर होणार आहे. या चाचणीबरोबर प्रत्येक्ष वाहन चाचणीही घेतली जाणार आहे. एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यासह सर्व तयारी ठेवण्यात आली आहे."

- सुबोध मेडसीकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

एक दृष्टिक्षेप..

  • राज्यात १५ प्रादेशिक परिवहन कार्यालय

  • ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

  • राज्यात ६५ कार्यालयांत सिम्युलेटर

  • रस्ता सुरक्षामधून ३ कोटी ९० लाख

loading image
go to top