बिबट्याचा हल्ला धाडसाने परतवला - लिंगायत

राजेश शेळके
Monday, 3 June 2019

रत्नागिरी - दुचाकीवरून जाताना बिबट्याने अचानक हल्ला केला. गाडीसह मी कोसळलो आणि स्वतःला सावरतोय तोपर्यंत समोर बिबट्याच्या रूपात काळ उभा होता. न डगमगता धीराने तसाच समोर उभा राहिलो. हातात हेल्मेट होते, बिबट्याने मला टप्प्यात घेऊन जोरदार झडप मारली. स्वतःला वाचवण्यासाठी हेल्मेटचा फटका बिबट्याला मारला. दोन वेळा त्याचा हल्ला परतवून लावला. 

रत्नागिरी - दुचाकीवरून जाताना बिबट्याने अचानक हल्ला केला. गाडीसह मी कोसळलो आणि स्वतःला सावरतोय तोपर्यंत समोर बिबट्याच्या रूपात काळ उभा होता. न डगमगता धीराने तसाच समोर उभा राहिलो. हातात हेल्मेट होते, बिबट्याने मला टप्प्यात घेऊन जोरदार झडप मारली.

स्वतःला वाचवण्यासाठी हेल्मेटचा फटका बिबट्याला मारला. दोन वेळा त्याचा हल्ला परतवून लावला. हल्ल्यात बिबट्याने खांद्याला चावा घेतला. पाठीला नख्यांनी ओरबडल्याने जखमी झालो. धाडस दाखवले म्हणून माझा पुनर्जन्म झाला असेच म्हणावे लागेल. 

बिबट्याशी चार हात करणाऱ्या धाडसी विश्‍वनाथ चंद्रशेखर लिंगायत (वय 28, रा. अडिवरे) यांनी अंगावर काटा आणणारी ही घटना "सकाळ'ला कथन केली. दोन दिवसांपूर्वीची ही घटना. सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली.

विश्‍वनाथ लिंगायत दुचाकी घेऊन रत्नागिरीतून पावसमार्गे आडिवऱ्याला जात होते. मेर्वी (ता. रत्नागिरी) येथे आल्यानंतर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यांनी बिबट्याला थोपवले. ते म्हणाले, बिबट्याच्या हल्ल्याने मी कोसळलो. यात माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली. स्वतःला सावरून हातात हेल्मेट घेतले. समोर बिबट्या उभाच होता. पळालो असतो तर बिबट्याने मागून हल्ला करून माझा जीव घेतला असता.

मृत्यू समोर दिसत होता. त्याच्याशी चार हात करण्याचे मनात आणले. जीव वाचविण्यासाठी हे धाडस केले. दबक्‍या पावलाने बिबट्या मागे-पुढे झाला आणि त्याने माझ्यावर झेप टाकली. मी हेल्मेटचा फटका मारून हल्ला परतवला. मी जखमी झालो. बिबट्या निघून गेला, असे वाटले. कसाबसा उठलो आणि दुचाकी घेऊन निघालो, एवढ्यात बिबट्याने पुन्हा माझ्यावर हल्ला केला. उजव्या खांद्याला चावा घेऊन पाठीत पंजा मारला. त्याच्या हल्ल्यातून सुटका करून घेण्यासाठी पुन्हा त्याला हेल्मेटचे तोंडावर फटके मारले. तेव्हा तो पळून गेला. धाडस दाखवले म्हणून मृत्यूच्या दाढेतून सुटलो. 

नागरिकांना आवाहन करते, की सकाळी सहापूर्वी आणि सायंकाळी सहानंतर निर्जनस्थळी जाऊ नका. जायचे असेल तर तिघे-चौघे किंवा घोळक्‍याने जा. जास्त लोक असले की बिबट्या हल्ला करणार नाही. बिबट्याला आपल्या उंचीपेक्षा कमी उंचीची व्यक्ती दिसल्यास ती आवाक्‍यातील सावज आहे, असे समजून हल्ला करतो. 

- प्रियांका लगड, परिक्षेत्र वनअधिकारी, रत्नागिरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishwanat Lingayat special story on Leopard attack