शिक्षक पतपेढीतील भरती बाबत विठ्ठल गवस म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

नियमावलीमध्ये झालेले बदल याचा अभ्यासपूर्ण सखोल आणि साकल्याने विचार करून चालवला जातो. प्राथमिक शिक्षक सहकार पतपेढी ही स्वायत्त पतसंस्था असून या संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीमध्ये केलेली शिपाई पदाची भरती ही सहकार कायदा, संस्थेचे पोटनियम, संस्था उपविधी व कर्मचारी नियमावली यांना अधिन राहून केली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि सद्‌सद्विवेक बुद्धीने मालक, सभासदांना अभिमान वाटावा अशीच केलेली आहे, अशी माहिती पतपेढी अध्यक्ष विठ्ठल गवस यांनी दिली. 

यावेळी उपाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, संचालक नामदेव जांभवडेकर उपस्थित होते. श्री. गवस म्हणाले, ""सहकार संस्थांचा कारभार सहकार कायद्यानुसार तसेच वेळोवेळी पोटनियमांमध्ये केलेले बदल, संचालक मंडळाला प्रदान केलेले अधिकार व 97 व्या घटना दुरुस्तीनंतर कर्मचारी

नियमावलीमध्ये झालेले बदल याचा अभ्यासपूर्ण सखोल आणि साकल्याने विचार करून चालवला जातो. प्राथमिक शिक्षक सहकार पतपेढी ही स्वायत्त पतसंस्था असून या संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. संस्थेचे असलेले भांडवल हे स्वनिर्मित असून संस्था स्वयंपूर्ण आहे. अशा संस्थेचा कारभार कुशल, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कर्मचाऱ्यांमार्फत चालविणे हे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. मुळात शिक्षक हा एकच संवर्ग मानून गुणवत्तापूर्ण उमेदवाराची निवड करणे, बढती देणे, बदली करणे, त्यांना सेवेत कायम करणे हे अधिकार पूर्णतः संचालक मंडळाला आहेत. कर्मचारी नियमावलीनुसार निवड झालेला शिपाई पदाचा उमेदवार पदोनत्तीने क्‍लार्क, शाखाधिकारी, अधीक्षक आणि सर्वोच्च सचिव पदापर्यंत जाऊ शकतो.

संचालक मंडळ हे 5 वर्षांनी बदलत असते; मात्र संस्थेला या स्पर्धेच्या व आधुनिक कॉम्प्युटर युगात टिकून राहायचे असेल तर कुशल, गुणवत्तापूर्ण, होतकरू, कसोटीला उतरणारा उमेदवार निवडणे हे कार्यरत असलेल्या संचालक मंडळाचे कर्तव्यच आहे. त्या अनुषंगाने सद्यस्थितीतील भरती ही संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेत आपल्याला असलेल्या अधिकारात, कायदे सल्लागारांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेच्या उपविधीलाही धक्का पोहोचणार नाही याची दक्षता घेऊन, रितसर वृत्तपत्रात जाहिरात देऊन सरळ सेवेने केलेली आहे. त्यामध्ये कोणत्याही संवर्गावर अन्याय होण्याचा प्रश्‍नच येत नाही.'' 

संस्था सभासदाने एखादी गोष्ट जाणून घेणे, निवेदन देणे, मागणी करणे किंवा सनदशीर कायद्याचा मार्ग अवलंबणे हा प्रत्येक सभासदाचा अधिकार आहे, हे समजू शकतो; मात्र सभासदाभिमुख आणि पारदर्शक कारभार असलेल्या संचालक मंडळाची नाहक बदनामी करणे ही बाब खेदजनक आणि नावाजलेल्या संस्थेच्या निश्‍चितच हिताची नाही, असे श्री. गवस म्हणाले. कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर भरती प्रक्रियेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराची व सोबत आलेल्या पालकांची शासनाच्या कोविड-19 संदर्भातील सूचनांनुसार योग्य ती काळजी घेतली आहे, असेही ते म्हणाले. 

नऊ ऑगस्टला झालेल्या शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये मी स्वतः व माझी पत्नी तसेच विद्यमान संचालक सहभागी नव्हते, तरीही संस्थेच्या सभासदांमध्ये व मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम काही मंडळींनी केले ही गोष्ट संस्थेच्या 3200 सभासदांना रुचणार नाही. 
- विठ्ठल गवस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vittal Gavas Comment On Recruitment In Teachers Bank