esakal | रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर इतिहासात प्रथमच बंद 

बोलून बातमी शोधा

Vitthal Temple In Ratnagiri Closed For First Time In History

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात होणारे काकडा आरती, महाप्रसाद, प्रवचन, कीर्तने, शेजारती असे सर्व उपचार या मंदिरात होतात. वर्षभर काकडा आरती होते. सध्या फक्त नित्य पूजा, आरती होत आहे.

रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर इतिहासात प्रथमच बंद 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - भारतीय स्वातंत्र्याचा मूक साक्षीदार आणि अनेक क्रांतीकारकांच्या विशेषतः वीर सावरकरांच्या भाषणांचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर इतिहासात प्रथमच बंद केले आहे. तसेच कोरोना (कोव्हिड-19) या विषाणूला रोखण्यासाठी विठुरायाला साकडे घातले आहे. 

शहराच्या मुख्य भागातील विठ्ठल मंदिर 1718 मध्ये शंकरदास गोपाळदास गुजरांनी बांधले. त्यांचे नातू भिकूदास लक्ष्मणदास गुजर यांनी 1820 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर 1926, 2002 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला. या मंदिराच्या आवारात श्री गणपतीसह, महाविष्णूपंचायतन आणि सर्व संतमंडळींची देऊळे असून आता नव्याने श्री स्वामी समर्थांचे मंदिर बांधले आहे. त्यामुळे येथे कायमच भाविकांची भरपूर वर्दळ असते. पण आता मंदिर बंद असल्याने कोणीही भाविक येथे आलेले नाहीत, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष आनंद मराठे यांनी दिली. 

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात होणारे काकडा आरती, महाप्रसाद, प्रवचन, कीर्तने, शेजारती असे सर्व उपचार या मंदिरात होतात. वर्षभर काकडा आरती होते. सध्या फक्त नित्य पूजा, आरती होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना याच मंदिरात अनेक भाषणे गाजली. या मंदिराला ब्रिटीशांकडून 1874 पासून बारा रुपयांची सनद सुरू होती.