esakal | देवरुखात व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

devrukh market

देवरुखात व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवरूख : गणेशोत्सवाला अवघे ६ दिवस शिल्लक असतानाही अद्याप तालुक्याच्या मुख्य बाजारपेठांमधील मंदी हटलेली नाही. यामुळे व्यापारी चिंतेत असून, आता बाजारपेठेतील मंदी हटण्यासाठी चाकरमान्यांची वाट पाहावी लागणार आहे.

गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाने व्यापाऱ्‍यांना खड्ड्यात घातले. यावर्षीचे जवळपास दोन महिने कडक लॉकडाउनमध्ये व त्यानंतरचे दिवस कडक निर्बंधांमध्ये गेले. यातून काही दिवसांपूर्वी पूर्ण वेळ व्यवसाय करण्याची संधी सर्वांना मिळाली असली तरी ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने व्यापारी हिरमुसलेले आहेत. शेतीची कामे जवळपास संपली आहेत. श्रावण सुरू असला तरी ग्राहकांचे बाजारात येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

गावोगावी एसटीच्या फेऱ्‍या सुरू झाल्या असल्या तरीही कोरोनाच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील मंदी कायम आहे. सकाळच्या सत्रात थोडे फार ग्राहक बाजारात असतात; मात्र दुपारी ३ वाजल्यानंतर तालुक्यातील बहुतांश सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असतो.

पावसाचे विघ्न कायम

गणेशोत्सवासाठी यंदा मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी येणार आहेत. येत्या दोन दिवसांत चाकरमानी गावी येण्यास सुरवात होईल. त्यानंतर तरी बाजारपेठेतील मंदी हटेल, या आशेत व्यापारी आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात पावसाचे विघ्न कायम आहे. पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मंदी हटण्यासाठी

देवरूख, साखरपा, संगमेश्‍वर, आरवली, माखजन, फुणगूस अशा महत्त्वाच्या बाजारपेठा तालुक्यात आहेत. या सर्व ठिकाणचा अंदाज घेतला असता, अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. यावर्षीचा गणेशोत्सव तोंडावर आला आहे. यामुळे १ तारखेपासून बाजारपेठेतील वर्दळ वाढण्याची व्यापाऱ्‍यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ४ तारीख उलटत आली तरीही बाजारात ग्राहकांची वर्दळ नसल्याने व्यापारी अजूनही ग्राहकांच्याच प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. यावर्षीची मंदी हटण्यासाठी आता व्यापाऱ्‍यांना चाकरमान्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

loading image
go to top