
२०५० पर्यंतच आपण काही प्रमाणात सुखनैव आयुष्य जगू शकू असे वातावरणीय अभ्यास सांगतो. प्रत्येकानेच आता सजग होणे अत्यावश्यक आहे. वातावरणातील बदल हा आपल्या चुकीच्या वागण्यामुळे हळूहळू होत गेला आणि आता या वातावरण बदलामुळे सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम झाल्याचे लक्षात येऊ लागले आहे. यावर्षीच गतवर्षीपेक्षा दोन अंशांने तापमानात वाढ झाली आहे. वातावरण बदल, तापमान वाढ हे सर्व मूलतः कचरा समस्येपासून सुरू होतात. बेदरकारपणे सर्वत्र टाकलेल्या कचऱ्यामुळे जमीन प्रदूषण, जलस्त्रोत दूषित होणे, समुद्राच्या तळापासून काठापर्यंत प्लास्टिकचे अच्छादन निर्माण होणे, हिमालयावरही प्लास्टिकचे कचऱ्याचे ढीग सापडणे सुरू आहे. जंगलतोड, काँक्रिटीकरण अशामुळे निसर्गचक्र तुटत आहे, किंबहुना बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्याकरिता भूमी, अग्नी, जल, आकाश, वायू या पंचमहाभूतांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही.
- प्रशांत परांजपे, दापोली