कारखाने सुरू ठेवल्यास पाणी जोडणी तोडणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

संपूर्ण देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र खेड तालुक्‍यातील लोटे - परशुराम एमआयडीसी आणि चिपळूण तालुक्‍यातील खेर्डी, खडपोली एमआयडीसीमधील काही कारखाने सुरू होते.

चिपळूण ( रत्नागिरी ) - चिपळूण व खेड तालुक्‍यातील एमआयडीसीमध्ये विना परवाना कंपन्या सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांच्या पाण्याचे कनेक्‍शन तोडले जाईल, असा इशारा एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता परशुराम करवडे यांनी दिला आहे. कंपन्यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचे त्यांनी सांगितले. 

संपूर्ण देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र खेड तालुक्‍यातील लोटे - परशुराम एमआयडीसी आणि चिपळूण तालुक्‍यातील खेर्डी, खडपोली एमआयडीसीमधील काही कारखाने सुरू होते. यातून कारखानदारांचा कोरोना आणि सरकारी आदेशाबाबतचा निष्काळजीपणा दिसून आला.

शेकडो कामगार कारखान्यांमध्ये एकत्र येत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची दखल घेवून कार्यकारी अभियंता करवडे यांनी विनापरवाना कंपन्या सुरू ठेवलेल्या कारखानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, बंदच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही कारखानदारांना नोटीस पाठवली आहे. काही कंपन्या अशा आहेत की त्या तातडीने बंद करता येत नाही. मात्र बंदची प्रक्रिया तातडीने सुरू करता येते. त्यामुळे काही कंपन्या बंदच्या प्रक्रियेत आहेत.

काही कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेवून कारखाने सुरू ठेवले आहेत. मात्र ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता कारखाने सुरू ठेवले आहेत. अशांवर आम्ही कारवाई करणार आहोत. लोटे, खेर्डी, खडपोली एमआयडीसीत विनापरवाना सुरू असलेल्या कारखान्यांची तपासणी करण्यासाठी उपअभियंता अशोक पाटील यांची नेमणूक केली आहे. जे कारखाने सुरू आहेत, तेथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता आणि कामगारांच्या आरोग्याबाबत काळजी घेतली जाते किंवा नाही याची माहिती घेतली जात आहे. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार असल्याचे श्री. करवडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Connection Of Factories Will Cut Down Ratnagiri Marathi News