वेळीच खबरदारी...टंचाईची चाहुल लागताच सिंधुदुर्गात हालचाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

नळ पाणी पुरवठा दुरुस्तीची 88 तर पूरक नळ पाणी दुरुस्तीच्या 5 कामांचा समावेश आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंतिम मंजुरीसाठी पाणी टंचाईच्या 145 कामांची अंदाजपत्रक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठविली आहेत. दोन दिवसांत या कामांना मंजुरी मिळेल, अशी शक्‍यता आहे. यात विंधन विहीर दुरुस्तीची 42 कामे, विहीर खोल करणे व गाळ काढणे 10 कामे, नळ पाणी पुरवठा दुरुस्तीची 88 तर पूरक नळ पाणी दुरुस्तीच्या 5 कामांचा समावेश आहे. 

उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 11 गावे 641 वाड्यांचा 7 कोटी 36 लाख 45 हजार रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच मंजुरी दिली होती. गतवर्षी हा आराखडा सहा कोटी 13 लाख रुपये एवढा होता. तर या आराखड्यात चार गावे आणि 513 वाड्यांचा समावेश होता. 

लॉक डाऊन मुळे टंचाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मर्यादा येत आहेत. ग्रामपंचायत स्थरावरून अ व ब प्रपत्र आल्यानंतर त्याची छाननी करून त्या जागेचे भूजल विभागाकडून सर्वेक्षण या बाबी असतात. या कामांना "कोरोना'मुळे थोडा ब्रेक लागला आहे. लॉक डाऊन पूर्वी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या टंचाईच्या कामांच्या अंदाजपत्रकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची स्वाक्षरी घेऊन अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठविली आहेत. 

पहिल्या टप्प्यात 145 कामांच्या अंदाजपत्रकांचा समावेश आहे. एकूण 3 टप्प्यात ही काम केली जातात. ग्रामीण भागातील जनतेला पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होतो. साधारणपणे दरवर्षी साडेतीन हजारपेक्षा जास्त मिलीमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, या तुलनेत पाणीसाठा होत नाही. ठराविक साठे वगळता उर्वरित पाणी थेट समुद्राला मिळते. परिणामी पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. 

टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई निवारण आराखडा एकूण 7 कोटी 36 लाख 45 हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. यात 11 गावे व 641 वाड्यांचा समावेश आहे. एकूण 3 टप्प्यात ही कामे पूर्ण करणे आवश्‍यक आहे. नळपाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीच्या कामासाठी 3 कोटी 58 लाख 45 हजार तरतूद आहे.

विंधन विहिरी दुरुस्तीची कामांना 7 लाख 30 हजार , नवीन विंधन विहिरी घेणे 1 कोटी 88 लाख 30 हजार, तात्पुरत्या पूरक नळयोजना घेणे 1 कोटी 25 लक्ष 50 हजार, विहीर खोल करणे, गाळ काढणे, सार्वजनिक विहीर दुरुस्त करणे 56 लाख 90 हजार रुपये आहेत. अशी एकूण 11 गावे, 641 वाड्यांना 7 कोटी 36 लाख 45 हजार निधी आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे. 

वाड्यांचा समावेश 
दोडामार्ग 20 वाड्या, सावंतवाडी तालुक्‍यात 45 वाड्या, वेंगुर्ल तालुक्‍यात 75 वाड्या, कुडाळ तालुक्‍यात 1 गाव 122 वाड्या, कणकवली तालुक्‍यात 2 गाव 112 वाड्या, वैभववाडी तालुक्‍यात 1 गाव 68 वाड्या, देवगड तालुक्‍यात 4 गावे 101 वाड्या आणि मालवण तालुक्‍यात 3 गावे व 98 वाड्यांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात टंचाईची चाहूल 
जिल्ह्यात केवळ 32 लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. ज्यात पावसाचे पाणी साठवणूक होते. यातील केवळ 2 ते 3 प्रकल्पातून शहर व प्राधिकरणमधील नागरिकांना फिल्टर करून पाणी पुरवठा केला जातो. उर्वरित ठिकाणी विहिरीच्या माध्यमातून तहान भागवली जाते. सध्याच्या परिस्थितीत कडकडीत ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water issue konkan sindhudurg