तेरोखोल पाणीप्रश्न पेटण्याची भीती, पण का?

water issue in terekhol river
water issue in terekhol river

ओटवणे (सिंधुदुर्ग) - तेरेखोल नदीच्या पाण्यावरून येथे स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यातला संघर्ष तीव्र स्वरूपात धुमसत आहे. पाण्याच्या प्रचंड उपशामुळे ओटवणेतील स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. पुढच्या काळात येथे पाणी पेटण्याची भीती व्यक्त होत आहे. 

ओटवणे दशक्रोशीत केरळीयन शेतकऱ्यांनी जमिनी घेऊन मोठ्या प्रमाणात बागायती केली. ओटवणे दशक्रोशीतील ओटवणे, विलवडे, सरमळे, वाफोली, विलवडे, बावळाट, दाभिल, भालावल, असनिये, घारपी, कोनशी आदी गावांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या जमिनी प्रामुख्याने तेरेखोल नदीच्या काठापासून सुरू होऊन डोंगर माथ्यापर्यंत पसरल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याचा उपसा केला जातो.

साहजिकच एवढा पाऊस होऊनदेखील मार्चच्या सुरुवातीलाच ओटवणेत तेरेखोल नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिष्य जाणवत आहे. केरळीयन शेतकऱ्यांचे अतिक्रमण आणि प्रशासनाचे त्यावर असणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे. त्यातच परप्रांतीयांकडून होणारी विजेची चोरी, त्याच विजेवर वापरण्यात येणारे मोठे विद्युत क्षमतेचे पंप यामुळे विजेच्या कमी व्होल्टेजने स्थानिक हैराण झाले आहेत. या विजेच्या कमी दाबामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोटर पंप जळणे, घरातील इलेक्‍ट्रिक उपकरणे जळणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परप्रांतीयांच्या या अवाजवी पाणी उपशामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायती मरणावस्थेत पडल्या आहेत. 

स्थानिक ओटवणे, विलवडे, सरमळे, वाफोली, बावळाट आदी गावांच्या ग्रामसभेतदेखील या बेसुमार पाणी वापरावर बंधने येऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे ठराव घेण्यात आले; पण शासन स्तरावरून अद्यापपर्यंत कारवाईची अशी कोणतीच पावले उचलली गेलेली नाहीत. अशा प्रकारांविरोधात कारवाई व्हावी, यासाठी दरवर्षी स्थानिकांकडून तक्रारी दिल्या जातात; पण या तक्रारींना केराची टोपली दाखवत अधिकारी गप्प आहेत, तर काही अधिकाऱ्यांवर या व्यावसायिकांचे आर्थिक छत्र असल्याने स्थानिक शेतकरी मात्र कोरडाच आहे. नदीवर बसविण्यात येणारे पंप हे मंजूर झालेल्या विद्युत क्षमतेपेक्षा अधिक हॉर्स पॉवरचे असतात; पण त्याशिवाय एरव्ही सामान्य जनतेला लाईट मीटरसाठी पायपीट करायला लावणारा महावितरण विभाग केरळीयन व्यापाऱ्यांना कशी काय परवानगी देतो हे सुद्धा कोडेच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

डोंगर भागात मोठ्या विहिरी 
केरळीयन लोकांनी येथील सह्याद्रीच्या पट्ट्यात अतिक्रमण करत उंच डोंगर भागात पाणी नेण्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहे. या डोंगर भागात मोठ्या विहिरी खोदल्या आहेत. मोठ्या क्षमतेचे पंप लावून डोंगर भागातील विहिरी भरण्यासाठी नदीच्या पाण्याचा भरमसाट उपसा होतो. अशा कित्येक विहिरी या डोंगर भागात आहेत. सद्यस्थितीत नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने मोठमोठ्या कोंडीतील पाणी पंपापर्यंत मिळविण्यासाठी जेसीबीच्या साह्याने चर खोदाई केली जाते, असे चित्रही समोर आले आहे. त्यामुळे नदी ओरबडण्याचे काम या संबंधितांकडून सुरू आहे. 

नदीचा उगम उद्‌ध्वस्त 
एरव्ही दाभिल नदीच्या बारमाही वाहणाऱ्या प्रवाहामुळे तेरेखोल नदी ऐन मे महिन्यातदेखील जिवंत असायची; पण दाभिल नदीचा ज्या उडेलीतील डोंगरातून उगम झाला त्या डोंगर रांगा परप्रांतीयांनी अतिक्रमणाने ताब्यात घेतल्याने तो उगमच उद्‌ध्वस्त झाला. या घारपी, उडेलीच्या शेकडो एकर डोंगर पट्ट्यात या व्यावसायिकांनी अननस, रबरच्या लागवडीसाठी डोंगर जेसीबीच्या साह्याने उजाड केले आहेत. त्यामुळे माती, दगडाच्या मोठ्या भरावाने येथील नैसर्गिक झरे संपुष्टात आले आहेत. 

नळपाणी योजनांवर परिणाम 
तेरेखोल नदीपात्रावर बावळाट, सरमळे, ओटवणे, विलवडे, चराठा, इन्सुली, वाफोली, मळगाव आदी गावांच्या नळयोजना कार्यान्वित आहेत; परंतु नदीच्या कोरडेपणामुळे, विजेच्या चोरीने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या विजेमुळे नळ पाणी योजनांवर परिणाम होत आहे. गावागावात पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

केरळीयन व्यावसायिकांच्या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्या आहेत. तरीदेखील शासनाला जाग येत नसेल आणि स्थानिकांनी कायदा हातात घेतला तर सर्वस्वी जबाबदार संबंधित शासन असेल. 
- उत्कर्षा गावकर, सरपंच, ओटवणे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com