एकीकडे कोरोनाची भीती, दुसरीकडे `हे`

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

अन्यथा दोन दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी दिला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  येथील एसटी स्थानकातील शौचालय तसेच बाथरूममध्ये पाणी नसल्याने येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. एकीकडे कोरोनाची भीती असताना नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या या स्थानकामध्ये हात धुण्यासाठी थेंबभरही पाणी नसणे गंभीर स्वरूपाची बाब असून याबाबत संबंधित प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा दोन दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी दिला आहे.

राज्य शासनाकडून सध्या कोरोनाबाबत खबरदारी घेताना विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्याबरोबरच लग्न समारंभ, आठवडा बाजार, बाजारपेठा बंद ठेवण्यात येत असताना येथील एसटी स्थानकातील शौचालय तसेच बाथरूममध्ये जाणाऱ्या प्रवाशांना हात धुण्यासाठी थेंबसुद्धा पाणी नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने कोरोनाबाबत अवश्‍य काळजी घेण्याचे आवाहन केले असताना येथील एसटी प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप श्री. भोगटे यांनी केला आहे. 

एसटी स्थानक परिसरात सद्यस्थितीत कचऱ्याचे ढीग असून येथे दिवसागणिक एक प्रवास यांची रीत असते; मात्र या स्वच्छता करण्यामध्ये एसटी प्रशासनाला अपयश येत असून याबाबत वेळोवेळी कल्पना देऊनही प्रशासन याला गांभीर्याने घेत नाही; मात्र येत्या दोन दिवसात ही परिस्थिती न बदलल्यास व शौचालय तसेच संडास यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून न दिल्यास प्रवाशांचाही आंदोलन करण्याचा इशारा श्री. भोगटे यांनी दिला आहे, याबाबत त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water problem in sawantwadi bus stand