#WaterScarcity धरणाशेजारच्या चांदेराईत पाणी टंचाई

#WaterScarcity धरणाशेजारच्या चांदेराईत पाणी टंचाई

रत्नागिरी - टंचाईच्या झळा जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील पुरग्रस्त आणि धरण उशाशी असलेल्या चांदेराईलाही टंचाईचा तडाखा बसला आहे. प्रतिदिन दोन लाख लिटर पाणी देणार्‍या योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. चांदेराईजवळी एमआयडीसीच्या हरचिरी धरणातील पाणी कमी झाल्याने चांदेराईवासीयांना हा फटका बसला आहे. एमआयडीसीने स्थानिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई-हरचिरी धरणातील पाणी आटले आहे. ते धरण रत्नागिरीतील औद्योगिक वसाहतीमधील वाणिज्य वापरासह नऊ ग्रामपंचायती आणि रत्नागिरी पालिकेसाठी वापरले जाते. हरचेरी धरणाच्यावर काजळी नदीपात्रात अंजणारी, निवसर, घाटीवळे आणि असुर्डे अशी पाच धरणे आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे सध्या नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाला आहे. पाणी कमी झाल्याने पात्राच्या दोन्ही बाजूला असलेले शेतकरी भाजीपालाही घ्यायला तयार नाहीत. विहिरींचे पाणीही आटले आहे. चांदेराईच्या बारा वाड्यांना टँकरशिवाय पर्यायच उरलेला नाही. चांदेराईतील एक हजार लोकवस्ती आग्रेवाडी ते शिवगणवाडीतील बारा वाड्यात आहे. त्यांच्यासाठी एक नळपाणी योजना असून 90 टक्के घरगुती जोडण्या आहेत. त्यांना दररोज 2 ते 2.50 लाख लिटर पाणी लागते.

योजना सुरु झाल्यानंतर वीस वर्षात अशी वेळ आलेली नव्हती. धरणातील पाणी नदीपात्रात येत नसल्यामुळे ही वेळ आली आहे. गाळामुळे नदीपात्र भरले गेल्याने धरणाच्या तळातील बाजूस पाणी येत नाही. गावाला पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक विहिरी धरणापासून सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर किनारी भागात आहे. पात्रातील पाणी किनार्‍यावरील विहीरीपर्यंत पोचवण्यासाठी गॅलरी तयार केली आहे. पाणी कमी झाल्यामुळे गॅलरीपर्यत पाणीच येत नसल्याने विहीरी कोरडी पडली आहे.

सोमवारी (ता. 20) अचानक पाणी येणे बंद झाल्यामुळे गोंधळ उडाला. गेले काही दिवस ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ पाण्यावर लक्ष ठेवून होते. गढून पाणी येऊ लागल्यामुळे अंदाजही आला होता. यावर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायतीत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सरपंच शिल्पा दळी, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष दादा दळी, महेंद्र झापडेकर यांच्याबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते.

चांदेराई धरणातील पाणी नदीपात्रात सोडून त्याचा वापर करता येऊ शकतो. धरण उशाजवळ असुनही स्थानिकांना यावर्षी पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याठिकाणी पाच सार्वजनिक विहिरी असून त्या पुर्णतः कोरड्या पडल्या आहेत. येथील वैयक्तिक विहीरींनीही तळ गाठला असून जॅकवेलवर हा एकमेव पर्याय आहे. दोन महसूली गावांसाठी एकमेव योजना असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही याच विहिरीवरुन स्वतंत्र योजना देण्यात आलेली आहे. तेथील पाणीही बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्याचा विपरीत परिणाम आरोग्य सेवेवरही होऊ शकतो. एमआयडीसीकडून धरण क्षेत्राबाहेरील साचलेले पाणी विहिरीपर्यंत आणून देण्यासाठी पावले उचलण्यात यावीत अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.

चांदेराई पुलाजवळ पाणी साठविण्यासाठी पुरक बंधारा एमआयडीसीने बांधून दिला तर भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही. त्यादृष्टीन चांदेराई ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन देणार आहे.

- बाबा दळी, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, चांदेराई

हा आहे पर्याय

जॅकवेलजवळ नदीपात्रात पाणी नाही. नदीला गॅलरी आहे. त्या नदीतील पाणी विहिरीत घेतले आहे. यामुळे गॅलरी कोरडी पडली आहे. चार साठे नदी पात्रात आहेत. तेथील पाणी जॅकवेलला आणायचे. तेथे बंधारा बांधून पाणी अडवून साठा करण्याचा एकमेव पर्याय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com