शासकीय अनास्थेमुळे पालीकरांना हकनाक टंचाईच्या झळा

pali
pali

पाली - अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदिचे पाणी पहिल्यांदा कमालीचे घटले आहे. त्यामुळे पालिकरांना आता एक दिवसाआड पाणी येणार आहे. केवळ शासकीय अनास्थेमुळे पालीकरांना हकनाक टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. 

पालीला अंबा नदीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. दर वर्षी उन्हाळ्यात देखील नदीला मुबलक पाणी असते. त्यामुळे केवळ मोटार पंप बिघडल्यास, वाहिन्या तुटल्यास, दुरुस्ती असल्यासच पालिकरांना अनियमित पाणी पुरवठा होत असे. मात्र या वर्षी पहिल्यांदा अंबा नदीची पाणीपातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात नदीला येथील जवळच असलेल्या उन्हेरे व कवेळे धरणातून नियमित पाणी मिळत असे. मात्र उन्हेरे धरणाची जॅकवेल पूर्णपणे मोडल्याने धरण आटले आहे. तसेच कवेळे धरणाला देखील गळती लागली आहे. याकडे पाठबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे नदीचे मुख्य पाणी स्त्रोतच संपूष्ठात आले. परिणामी शासकीय अनास्थेमुळे पालिकरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या पाणी घटल्याने जेकवेलमधील मोटार पंप वर दिसत आहेत.  पाणी ओढल्यानंतर पुन्हा नदीत पाणी भरण्यास एक दिवस जातो. म्हणून पालीला आता एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे असे ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांनी सकाळला सांगितले.

तालुक्यातील धरणाची अवस्था दयनीय
तालुक्यात उन्हेरे, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत आणि कवेळे हि पाच मोठी धरणे आहेत. त्यातील उन्हेरे धरणाची जॅकवेल मागील 3 वर्षांपासून मोडकळीस आली होती. अखेर ती आता पूर्णपणे ढासळली. तसेच डागडुजी अभावी हे धरण मरणासन्न अवस्थेत अाहे. कवेळे धरणाला देखील गळती लागली अाहे. तातडीने ही दोन्ही धरणे दुरुस्त करण्याची अावश्यकता आहे. तर कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत धरणाच्या कालव्याच्या बंदिस्थ नलिकांमध्ये (पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) शेवाळ, मुळ्या, घाण व कचरा जावून त्यांच्यात बिघाड झाला आहे. उन्हेरे धरणाची वेळीच दुरुस्ती केली असती तर पालिकरांना टंचाईला सामोरे जावे लागले नसते. यासंदर्भात सकाळने अनेकवेळा बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. 

पाण्यासाठी अजून थोडे थांबा
कवेळे तसेच ढोकशेत व कोंडगाव धरणाचे पाणी अंबा नदीला सोडण्यासाठी पाली ग्रामपंचायतीतर्फे कोलाड येथील पाठबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे. पाठबंधारे विभागाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र काही अंतर दूरवर असलेल्या धरणातून पाणी सोडल्यावर ते पहिल्यांदा इतर कालव्यांना जाईल, मग सुकेले नाले व ओहळ आणि त्यांनतर नदीला मिळेल. यासाठी जवळपास 10-12 दिवस जातील. परिणामी तो पर्यंत पालिकरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. 

ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व उपाय करत आहोत. धरणाचे पाणी येईपर्यंत नदीला काही अंतरावर चर खोदून पुढील पाणी घेण्यात येईल. जेणेकरून पाणीसाठा वाढेल. नागरिकांनी देखील थोडे दिवस पाणी जपून वापरून सहकार्य करावे.
- गणेश बाळके, सरपंच, ग्रूप ग्रामपंचायत पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com