बापरे! बोरज धरणात फक्त महिनाभर पुरेल इतकेच पाणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

खेड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न उभा राहणार आहे. गेट ऑपरेट सिस्टीम बंद पडल्याने हा प्रकार घडला.

खेड (रत्नागिरी) : खेड नगरपालिकेच्या बोरज धरणातील पाणी वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे आता खेड शहराला केवळ महिनाभर पुरेल इतकेच पाणी धरणात शिल्ल्क राहिले आहे. खेड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न उभा राहणार आहे. गेट ऑपरेट सिस्टीम बंद पडल्याने हा प्रकार घडला.

धरणातून खेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी चक्राकार गतीने फिरणारी गेट ऑपरेट सिस्टीम फार पूर्वीपासून येथे बसवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ही सिस्टीम बंद झाली आणि गेट ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारा रॉड फिरायचे बंद झाले. त्यापूर्वी पाणी खेडच्या पाइपलाइनमध्ये सोडण्यात आले होते. पुन्हा ते बंद झाले. त्यामुळे अन्यत्र खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. जे थोडेफार पाणी शिल्लक आहे ते पाणी महिनाभर पुरेल, अशी शक्‍यता आहे. जुनी प्रणाली असल्याने त्याची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे असते पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने धरणातील पाणी वाहून गेले आहे.

हेही वाचा - रात्री गारठा तर दिवसा ढगाळ वातावरण
 

आता तातडीने दुरुस्त करण्याची कामगिरी एका माहितगार ठेकेदाराला देण्यात येणार असून धरणातील प्रणाली पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. बोरज धरणातील गेट ऑपरेट करण्याची सिस्टीम बंद पडल्याने धरणातील पाणी वाहून गेले. याचा परिणाम म्हणून खेडला केवळ महिनाभर पुरेल इतकेच पाणी धरणात शिल्ल्क राहिले आहे.

बोरज धरणातून गुरूत्वीय बलाने खेड शहराला पाणीपुरवठा केला जातो. साधारणपणे फेब्रुवारीअखेर या धरणाचे पाणी शहराला मिळते. पण यावर्षी आता भरणे येथील जॅकवेलवरच अवलंबून राहावे लागणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे तसेच उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा समितीचे सभापती सुनील दरेकर यांनी दिली.

दुर्लक्ष कोणाचे झाले ?

गुरूत्वीय बलाने या धरणातील पाणी खेडपर्यंत येत असल्याने विजेची मोठ्या प्रमाणात बचत होते. आता भरणे येथून पाणी घेतले की त्यासाठी वीज बिल भरावे लागेल. त्यामुळे आता या प्रकाराकडे नेमके कोणाचे दुर्लक्ष कोणाचे झाले हा प्रश्‍न या निमित्ताने समोर आला आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply of boraj dam in khed ratnagiri one month water supply available