संगमेश्वर तालुक्यातील `हे` पाणलोट बंधारे असुरक्षितत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

तिथे संरक्षक कठडा नसतो. त्यामुळे अतिउत्साही तरुण मुलं अथवा लहान मुलंही पोहण्याच्या आकर्षणाला बळी पडून बंधाऱ्यामध्ये उतरतात.

आरवली ( रत्नागिरी) - संगमेश्वर तालुक्‍यातील माखजन, धामापूर, करजूवे परिसरात पाणलोट विभागामार्फत बांधलेले बंधारे सध्या असुरक्षिततेच्या कारणास्तव धोकादायक बनत आहेत. 

पंधरा दिवसांपूर्वी धामापूर भायजेवाडी गायमुखाजवळील जलबंधाऱ्यात दोन युवकांचा बुडून झालेल्या मृत्यूने बंधाऱ्यांची असुरक्षितता समोर आली आहे. सध्या पावसाळ्यात बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत असून या पाण्यात पोहायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. अशावेळी त्या ठिकाणी बंधाऱ्यांची माहिती देणारा फलक किंवा सूचना देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसते.

तिथे संरक्षक कठडा नसतो. त्यामुळे अतिउत्साही तरुण मुलं अथवा लहान मुलंही पोहण्याच्या आकर्षणाला बळी पडून बंधाऱ्यामध्ये उतरतात. अनेकदा या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यामध्ये बुडतात. ग्रामपंचायत स्तरावर सूचना देणाऱ्या फलकांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याची गरज आहे. 

बंधाऱ्यामुळे पाणी अडवून स्थानिक विहिरींना पाणी वाढण्यासाठी नक्कीच मदत होत आहे. त्यामुळे गावाला पाणी पुरवठा होत आहे; मात्र बंधाऱ्यांची असुरक्षितता सध्या मृत्यूचे कारण ठरल्यास दोष कुणाला द्यायचा, हा प्रश्न अनुत्तरित ठरत आहे. 

बंधारे पाच ते सात फूट खोल आहेत. त्यावरून वाहणारे पाणी धबधब्यासारखे पडते. बंधाऱ्याखाली खोल खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यात वाहत असलेले पावसाचे पाणी धोकादायक आहे. उन्हाळ्यात हे खड्डे बुजविण्याचा विचार आहे. 
- शांताराम भायजे, सरपंच, धामापूर.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watershed Dams In Sangameshwar Taluka Unsafe