
मार्गदर्शन सूचना पाळून पर्यटन सुरू करता येणार आहे.
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यात आता रेस्टॉरंट, हॉटेल, फूड कोर्ट आणि बारना सशर्त परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी दिले आहेत. या आस्थापना आवश्यक दक्षता घेऊन 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. यामुळे जिल्ह्यातील थांबलेले पर्यटनपुन्हा गतीने सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
जिल्ह्यात शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, शिकवणी देणाऱ्या संस्था आदी 31 पर्यंत बंद राहतील; मात्र ऑनलाईन, दूरस्थ शिक्षणास परवानगी असेल. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, नाट्यगृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्ससह) ऑडिटोरियम असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील. एमएचएने परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारे मेळावे प्रतिबंधित असतील. सर्व प्रकारची जीवनाश्यक वस्तू असलेली दुकाने, आस्थापना या कार्यालयाकडून या पूर्वीच्या आदेशांप्रमाणे यापुढेही सुरु राहतील. या पूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेल्या बाबी, क्षेत्रे पूर्ववत सुरू राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश या आदेशास संलग्नित राहतील.
ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचे बंधन असणार नाहीत. कोविड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय निर्देशानचे पालन करण्यात यावेत. यामध्ये सर्व नागरिकांना सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकण्याचे साधन वापरणे बंधनकारक असेल. मोठ्या प्रमाणात उपस्थितीतीने आयोजित करण्यात येणारे मेळावे, समारंभ प्रतिबंधित असतील. तथापी विवाह कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक तसेच अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 20 नातेवाईक, नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहण्यास परवानगी असेल.
या निर्णयामुळे सर्वाधिक दिलासा पर्यटन व्यवसायाला मिळाला आहे. मार्गदर्शन सूचना पाळून पर्यटन सुरू करता येणार आहे. यासाठीच्या सविस्तर सूचना पर्यटन विभागाकडून जारी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पर्यटन थंडावले होते. आता सीमा खुल्या झाल्यानंतर पुन्हा याला गती येईल, अशी व्यावसायिकांची अपेक्षा आहे. याला या नव्या आदेशामुळे बळ मिळणार आहे.
निकष पाळणे बंधनकारक
सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकी दरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक असेल. दुकान व दुकान परिसरामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्ती, गिऱ्हाईक यांना प्रतिबंध असेल. उपस्थित असलेल्या व्यक्ती, ग्राहकांमध्ये सहा फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल.
संपादन : विजय वेदपाठक