सिंधुदुर्गवासियांचे विमानतळाचे स्वप्न साकारण्याचा मार्ग खुला

शिवप्रसाद देसाई
Tuesday, 22 September 2020

राज्यसभेत केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री पुरी यांनी  चिपी विमानतळ सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी (ता. वेंगुर्ले) येथील विमानतळ सुरू करण्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे दीर्घकाळ आवश्‍यक परवानग्यांअभावी चिपीमध्ये विमान उतरण्याचे रखडलेले स्वप्न आता साकारण्याचा मार्ग खुला झाला आहे. सोमवारी राज्यसभेत केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. 

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात विमानतळ व्हावा, असे स्वप्न बराच काळ होते. चिपी येथे जागा निश्‍चित होऊन हे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने पावले पडायला लागली. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सुरवातीच्या टप्प्यात प्रयत्न केले. हा प्रकल्प आयआरबी कंपनीमार्फत साकारला जात आहे. सत्ताबदल झाल्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रकल्प केंद्राच्या उडान योजनेमध्ये घेतला. याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्‌घाटनही झाले. हवाई वाहतूक मंत्रालयाचा अतिरिक्‍त कार्यभार श्री. प्रभू यांच्याकडे असताना या विमानतळावरून होणाऱ्या प्रस्तावित वाहतूक मार्गाबाबत बोलीही मागवण्यात आल्या होत्या; मात्र केंद्राकडून आवश्‍यक काही परवानग्या मिळाल्या नसल्याने विमानतळ सुरू होण्यास अडचणी येत होत्या. खासदार विनायक राऊत यांनी विमानतळ लवकरच कार्यान्वित होईल, असे संकेत दिले होते. 
सोमवारी राज्यसभेत केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री पुरी यांनी एकूणच विमान वाहतुकीबाबत दिलेल्या लेखी निवेदनात सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. उडान योजनेतून एकूण 688 मार्गांना मंजुरी मिळाली आहे. यातील 281 मार्गांचा वापरही सुरू झाला आहे. 25 मे पासून देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी आहे. सरकारने उडान 4.0 च्या पहिल्या टप्प्यात 78 नवीन मार्गांना मंजुरी दिली. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, अमरावती, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, दारणा कॅंप, देवळाली, धुळे, गोंदिया, जत, कऱ्हाड, कवळपूर, कुडाळ (सिंधुदुर्गातील नव्हे) लातूर, लोणावळा एमबी व्हॅली, उस्मानाबाद, फलटण, वाळूज आदींचा समावेश असल्याचे श्री. पुरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. 

केंद्राकडून परवाने व इतर तांत्रिक गोष्टींबाबत पूर्तता झाली आहे; मात्र चिपी विमानतळावर स्कॅनिंग मशिन, विशिष्ट प्रकारचे कॅमेरे, बेल्ट आदी यंत्रणा बसवण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. ही यंत्रणा आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होणे आवश्‍यक आहे. ही यंत्रणा बसवायला साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागेल. यंत्रणा बसल्यानंतर अंतिम लायसन्स मिळाले. पण ती केवळ औपचारिकता असेल. त्यामुळे डिसेंबरपर्यंत विमानतळ सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
- विनायक राऊत, खासदार 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The way is open for the people of Sindhudurg to realize their dream of an airport