दापोलीत बाप्पाचे स्वागत पीपीई कीट घालुन

चंद्रकांत जोशी
Saturday, 22 August 2020

नंदकुमार महाजन यांच्या उपक्रमाला यजमानांकडून चांगला प्रतिसाद मिळाला

दाभोळ : कोरोनाचा देशभर प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आपली आणि यजमानांच्या आरोग्याची काळजी घ्यावी या उद्देशाने आज दापोलीतील एका पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींनी पीपीई कीट घालुन गणपतीच्या पूजा सांगण्याचा उपक्रम राबविला. नंदकुमार महाजन यांच्या उपक्रमाला यजमानांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा - आता मोबाईल वापरा जरा जपुनच !

दापोली येथील कोकंबा आळी येथे वास्तव्यास असलेले नंदकुमार महाजन हे गेले 35 वर्षांहून अधिक काळ पौरोहित्य करत आहेत. या कालावधीत भाद्रपद चतुर्थीला आपल्या यजमानांकडे गणपतीच्या पूजा सांगण्यास ते जातात. मात्र यावर्षी देशभर कोरानाचा प्रादुर्भाव असल्याने पूजा सांगायला जायचे की नाही असा प्रश्न त्यांना पडला होता. आपल्या हातून गणेशाची सेवा होत असल्याने दरवर्षीप्रमाणे पूजा सांगायच्या हेतूने त्यांनी आपल्या मुलाला  बाजारपेठेतून  पीपीई कीट आणायला सांगितले.  

ते पीपीई कीट घालुन महाजन गुरुजी आज सकाळी यजमानांच्या घरी गणेश पूजा सांगण्यास गेले होते. कोरोना संबंधित असा उपक्रम राबवणारे आणि पीपीई कीट घालून गणपतीची पूजा सांगण्यास गेलेले दापोलीतील ते पहिलेच गुरुजी आहेत.  ज्यांच्या घरी पूजा आहे त्यांना गुरुजी मास्क घालण्यास सांगत होते. आज दिवसभरात पीपीई कीट परिधान करुन 11  ठिकाणी गणपतीच्या पूजा सांगितल्याची माहिती महाजन गुरुजी यांनी सकाळशी बोलताना दिली.

त्यांच्या यजमानांमध्ये दापोली उपजिल्हा रुग्णालयातील प्रख्यात सर्जन डॉ. कुणाल मेहता यांचाही समावेश आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये पीपीई कीट परिधान करुन रुग्णसेवा करणारे  डॉ. कुणाल मेहता आज गणपतीची पूजा करण्यासाठी सोवळे नेसून होते तर त्यांना पूजा सांगणारे नंदकुमार महाजन गुरुजी पीपीई कीट परिधान करुन  होते.

हेही वाचा -  कोकणात ऐन सणात भाजी महागणार ?

संपूर्ण देशभर कोरानाचा प्रभाव वाढत आहे. गणपती उत्सवावरही याचे सावट असून प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. अनेक यजमानांच्या घरी वृद्ध तसेच लहान मुले असतात त्यामुळे त्यांच्याकडे गणपतीची पूजा सांगायला गेल्याने त्यांना कोणताही अपाय होउ नये या काळजीतूनच आपण आज पीपीई कीट परिधान करुन गणपतीच्या पूजा सांगण्यासाठी घराबाहेर पडलो. पीपीई कीट घालून गेल्याचे पाहून आपले अनेक यजमानांनी चांगले स्वागतच केले.

- नंदकुमार महाजन, दापोली

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wearing ppe kit to welcome of ganesh pujan at people home in dapoli