
खेडात मूसळधार, मच्छी मार्केट परिसरात जगबुडीच्या पुराचे पाणी घुसले
खेड : खेड शहर व तालुक्याच्या ग्रामिण भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. तालुक्यात आत्तापर्यंत 355 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नद्यांच्या लगत असलेली शेती व वीट भट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. ह्या पावसाचा जोर कायम राहील्यास ग्रामिण भागात जाणारे मार्ग बंद होण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जोर वाढत असुन, ग्रामिण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. संततधार पावसामुळे खेड मटण -मच्छी मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले.
त्यामुळे मच्छीमार्केट परिसरातील व्यापार्यांची एकच धांदल उडाली. तेथील व्यापार्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बोटींचा वापर केला. आज सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास येथील प्रांताधिकारी सौ.राजेश्री मोरे व तहसिलदार सौ.प्राजक्ता घोरपडे यांनी देखील खेड शहर आणि परिसरातील आपद्ग्रस्त भागाची पहाणी केली. त्यानुसार त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांना आवश्यकती काळजी घेण्याच्या सुचना केल्या.
हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार सोमवार ता.4 रोजी सकाळपासूनच खेडमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. प्रशासनाने नदीकिनार्यावरील नागरिकांना सावधानता व सुरक्षितता बाळगण्याच्या सुचना दिल्या आहेत. शेतीची लावणीची कामे सुरू असली तरी नदीच्या किनार्यावरील शेतजमिनी मध्ये शेतकर्यांनी शक्यतो दुरू राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरासह ग्रामिण भागातील लहान मोठ्या नद्या, ओढे - नाले तुडूंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने तालुक्यातील जगबुडी व नारंगी या दोन प्रमुख नद्यांनी रौद्र रुप धारण करण्यास सुरवात केली आहे. सांयकाळी पाच वाजता जगबुडी नदीने 6.50 मिटर ची पातळी गाठली होती. त्यानंतर जलस्तर वेगाने वाढला असुन, सद्या जगबुडी नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. नदी किनार्यावर मासे मारी करणार्यासाठी कोणीही जावू नये अशा सुचना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक देखील धिम्या गतीने सुरू आहे.
Web Title: Weather Update 355 Mm Of Rainfall In Khed Jagbudi River Crossed The Danger Level
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..