esakal | दोडामार्गातील 120 बसफेऱ्या बंद 

बोलून बातमी शोधा

weekend lockdown impact st bus facility konkan sindhudurg

दुसरीकडे गोव्यात ये-जा करणाऱ्या नोकरदार युवक युवती व अन्य प्रवाशांसाठी गोवा राज्यातील खासगी मिनी बस दोडामार्गमध्ये येतात. शिवाय गोव्याच्या कदंबा ट्रान्सपोर्टच्या बसेसही येतात; पण विकेंड लॉकडाऊनमुळे गोव्याने रात्रीच कदंबा बसेस परत बोलावल्या तर खासगी मिनी बसेसना सीमेवरूनच गोव्यात पाठवण्यात आले.

दोडामार्गातील 120 बसफेऱ्या बंद 
sakal_logo
By
प्रभाकर धुरी

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळाची अत्यावश्‍यक सेवा विकेंड लॉकडाउनमध्ये सुरू ठेवण्यात आली होती; मात्र बससेवेला प्रवाशांचा प्रतिसादच नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे दोडामार्ग तालुक्‍यातील जवळपास 120 बस फेऱ्या प्रवाशांअभावी बंद राहिल्या. 

दुसरीकडे गोव्यात ये-जा करणाऱ्या नोकरदार युवक युवती व अन्य प्रवाशांसाठी गोवा राज्यातील खासगी मिनी बस दोडामार्गमध्ये येतात. शिवाय गोव्याच्या कदंबा ट्रान्सपोर्टच्या बसेसही येतात; पण विकेंड लॉकडाऊनमुळे गोव्याने रात्रीच कदंबा बसेस परत बोलावल्या तर खासगी मिनी बसेसना सीमेवरूनच गोव्यात पाठवण्यात आले. त्यामुळे गोव्यातून येणाऱ्या आणि गोव्यात जाऊ इच्छीणाऱ्यांचे हाल झाले. सीमेवरील तपासणी नाक्‍यावरील पोलिसांकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्याला त्या बसेसना दोडामार्गमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

अत्यावश्‍यक सेवा असूनही श्री. घाग यांनी ती बंद ठेवल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान कोल्हापूर, पणजी, सावंतवाडी, वेंगुर्ले, चंदगड येथून अनेक प्रवासी बसेस दोडामार्गमध्ये येतात. त्यामुळे साधारणतः सावंतवाडी, कोल्हापूर, पणजी, बेळगाव या मार्गाप्रमाणेच तालुक्‍यातील गावागावांत बसेस ये-जा करतात. लॉकडाउनमध्ये सेवा सुरू ठेवूनही प्रवासी नसल्याने जवळपास 120 फेऱ्या बंद राहिल्या. 

मांगेली फणसवाडी, झरेबांबर आणि पाळये येथील वस्तीच्या बसेस सकाळी आल्या; पण प्रवासी नव्हते. तरीही बसेस सहा, आठ आणि दहा वाजता सावंतवाडीकडे मार्गस्थ केल्या. प्रवाशांचा मात्र प्रतिसाद लाभला नाही. तीच अवस्था सावंतवाडीतून इकडे येणाऱ्या गाड्यांची असल्याने त्याही आल्या नाहीत. असे असले तरी प्रवासी मिळाल्यास बस सुरू करू. 
- अमोल कामते, वाहतूक नियंत्रक, दोडामार्ग 

संपादन - राहुल पाटील