कुडाळ तालुक्यात पावसाने `या` गावची विहीर जमीनदोस्त

Well Damage In Goveri Palkarwadi Due To Heavy Rains In Kudal
Well Damage In Goveri Palkarwadi Due To Heavy Rains In Kudal

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोवेरी पालकरवाडी येथील विहीर जमीनदोस्त झाली. तेथील शेतकरी चंद्रकांत कोंडस्कर यांच्या घराला लागून असणारा मांगर कोसळल्याने आतील तीन गुरे सुदैवाने बचावली. ही घटना काल घडली. 

तालुक्‍यात गेले आठ दिवस पाऊस थांबला होता. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता; मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने मुसळधार सुरुवात केल्यामुळे येथील शहरातील भंगसाळ नदीचे जुने पूल पाण्याखाली गेले तसेच आंबेडकर नगरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही घरांना पाण्याने वेढले. पावशी बेल नदीलासुद्धा पाणी आले; मात्र वाहतुकीवर परिणाम झाला नाही. तीन दिवस तालुक्‍याला पावसाने झोडपून काढले. शहराबरोबर तालुक्‍यातील अनेक ठिकाणी नदी- नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. बऱ्याच ठिकाणी भातशेती तीन दिवस पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

आज सकाळी पावसाची संततधार कमी होती; मात्र दुपारपासून पावसाने मुसळधार सुरुवात केल्यामुळे तसेच पुन्हा तालुक्‍यात ग्रामीण भागात नद्यांना पूर आल्यामुळे जैसे थे परिस्थिती उद्‌भवली. गोवेरी पालकरवाडी येथे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत 2005 मध्ये विहीर बांधण्यात आली होती. ही सार्वजनिक विहीर काल (ता. 4) झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. या विहिरीवरच पालकरवाडीतील सर्व लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत होते. त्या विहिरीची देखभाल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत होती. या विहिरीच्या दुरुस्तीची मागणी यापूर्वी करण्यात आली होती.

या विहिरीनजीक असणाऱ्या लोकांना धोका निर्माण होऊ नये, म्हणून विहिरीभोवती कंपाऊंड घालण्यात आले आहे. शिवसेना महिला पदाधिकारी तथा तेंडोली जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, सरपंच सदफ खुल्ली, ग्रामसेवक संतोष पिंगुळकर, तलाठी सौ. परब, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान अरमलकर यांनी पाहणी केली. यावेळी भिवा जाधव, शरद निकम, बाळा ठोंबरे, बाळा भगत, प्रमोद डोंगरे, छाया कोंडस्कर, प्रसाद कोंडस्कर, प्रसाद डोंगरे, अश्‍विन पालकर, संतोष पालकर, सुरेश पालकर, दीपक पालकर, बाळा अरमलकर, वसंत पालकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

सुदैवाने गुरे बचावली 
या गोवेरी पालकरवाडी येथील शेतकरी यांचा मांगर त्यांच्या घरालाच लागून आहे. मुसळधार पावसामुळे त्यांचा मांगर कोसळला. या ठिकाणी तीन गुरे होती. ते घरातच असल्याने त्यांनी सर्व गुरांना बाहेर काढले; मात्र या तिघांना बाहेर काढताना गाईला मार लागला. या ठिकाणी श्रीमती कुडाळकर यांच्यासह इतर सर्वांनी पाहणी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com