वेळागरमधील पंचतारांकीत हॉटेल प्रकल्पात शिवसेनेची भूमिका काय?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

शिरोडा-वेगळार येथील जमिन हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. त्याअनुषंगाने खासदार विनायक राऊत यांनी वेळागरमधील सर्वे क्रमांक 39 बाबत आपण भूमिपूत्रांसोबत आहोत असे म्हटले आहे 

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - शिरोडा वेळागर येथे प्रस्तावित पंचतारांकीत हॉटेल प्रकल्पावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ यांच्या आरोपांना शिवसेनेने उत्तर दिले आहे. 

शिरोडा-वेगळार येथील जमिन हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. त्याअनुषंगाने खासदार विनायक राऊत यांनी वेळागरमधील सर्वे क्रमांक 39 बाबत आपण भूमिपूत्रांसोबत आहोत असे म्हटले आहे. यावर जिल्हा परिषद सदस्य राऊळ यांनी शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य बालीश व दिशाभूल करणारे आहे, असा प्रतिआरोप रेडी शिवसेना विभागप्रमुख काशिनाथ नार्वेकर यांनी

प्रसिद्धपत्रकातून केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खासदार नारायण राणे हे जिल्ह्याचे नेतृत्व करीत होते. त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हुकुमशाही व दंडुकेशाही पद्धतीने हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे स्थानिक जनता पेटून उठली व संघर्ष समिती स्थापन झाली. त्याठिकाणी त्या नेतृत्वाच्या आदेशाने झालेला लाठीचार्ज व त्यामुळे भूमिपूत्रांना झालेल्या जखमा आजही ते विसरलेले नाहीत. त्यामुळे राऊळ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी खासदार राऊत यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न करु नये. भूमिपूत्राच्या जखमेवर मिठ चोळू नये. 

प्रकल्पाबाबत भूमिपूत्रांच्या समस्या व त्यांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा याबाबत खासदार राऊत यांनी वेळागर येथे जाऊन स्थानिक भूमिपूत्रांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री, आमदार आणि ताज ग्रुप यांच्याशी चर्चा करुन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या मुद्दयांच्या अनुषंगाने पर्याय काढण्याचा प्रयत्न केला जाईल.त्यामुळे हा प्रकल्प योग्यरितीने तालुक्‍यातील लोकांना न्याय देऊन पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेना ही नेहमी प्रयत्नशील राहील. त्यामुळे राऊळ यांनी यात लुडबुड करु नये. 
- काशिनाथ नार्वेकर, शिवसेना रेडी विभागप्रमुख  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Is Role Of Shiv Sena In Five Star Hotel Project In Velagar