esakal | रिफायनरी प्रकल्पाला मुख्यमंत्री कोणता सिग्नल दाखविणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

What Signal Will Chief Minister Uddhav Thackeray Give To Refinery Project

कोरोनाच्या लॉकडाऊनपूर्वी डोंगर तिठा येथे प्रकल्प समर्थकांनी जाहीर मेळावा घेऊन आपली ताकद साऱ्यांना दाखवून दिली आहे.

रिफायनरी प्रकल्पाला मुख्यमंत्री कोणता सिग्नल दाखविणार ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - रिफायनरी समर्थकांचा आवाज आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचला आहे. त्यामुळे याची दखल घेऊन मुख्यमंत्री रिफायनरीला कोणता सिग्नल दाखविणार? याची साऱ्यांना उत्सुकता लागली आहे. 

या प्रकल्पाला स्थानिक जनतेकडून केल्या जात असलेल्या विरोधाला राजकीय पाठबळ मिळाले. त्यातून, प्रकल्पविरोधी वातावरण निर्माण झाले. त्याचवेळी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्याची राजकीय असो वा शासन दरबारी फारशी दखल घेतली गेलेली नाही; मात्र, आता प्रकल्प समर्थकांची संख्याही वाढू लागली आहे. 

कोरोनाच्या लॉकडाऊनपूर्वी डोंगर तिठा येथे प्रकल्प समर्थकांनी जाहीर मेळावा घेऊन आपली ताकद साऱ्यांना दाखवून दिली आहे. रिफायनरी प्रकल्पाचे जोरदार समर्थन करणाऱ्या प्रकल्प समर्थकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाकडे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांना पोहचविला गेला नसल्याचा आरोप प्रकल्प समर्थकांकडून केला जात आहे. ही बाब आता काळाच्या पडद्याआड गेली असून, प्रकल्प समर्थकांचे म्हणणे आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत गेले आहे. 

कोरोनामध्ये अनेकांवर टांगलेले बेरोजगारीचे संकट आणि रिफायनरीमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळणाऱ्या लाखो नोकऱ्या, कोकणचा होणारा विकास आणि रिफायनरीच्या अनुषंगाने होणारे अन्य फायदे यांचा विचार करून रिफायनरीला शासनाने "ग्रीन सिग्नल' द्यावा, अशी मागणी प्रकल्प समर्थकांकडून केली जात आहे. या त्यांच्या मागण्यांचा विचार करून मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

राजापूर तालुक्‍यासह कोकणच्या विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाची आवश्‍यकता असून तो राजापूरात व्हावा. या प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळताना अनेकांना रोजगार मिळणार आहे. याचा मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून रिफायनरीला ग्रीन सिग्नल द्यावा. 
- विद्या राणे, प्रकल्प समर्थक शेतकरी