रत्नागिरीत ग्रामपंचायतींवर होईल अपात्रतेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

प्रत्येक गावातील घरांत नळजोडणी दिली जाणार असून, तसे न केल्यास ग्रामपंचायतीला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. 

रत्नागिरी : तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या ३१७ शाळांपैकी २८८ शाळांना नळजोडण्या आहेत. अजूनही २९ शाळांमध्ये नळजोडणी नाही. त्या शाळांना जलजीवन मिशनमधून जोडण्या देणार आहेत. त्याचबरोबर जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक गावातील घरांत नळजोडणी दिली जाणार असून, तसे न केल्यास ग्रामपंचायतीला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. 

‘जलजीवन’ मिशन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गावोगावी २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला 
वैयक्तिक नळजोडणी देणार आहे. रत्नागिरी तालुक्‍यातही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी दिली जाणार आहे. ‘जलजीवन मिशन’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाणीपुरवठा विभागाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांनी कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तालुकानिहाय योजनांबाबत स्वतंत्र यादी निश्‍चित केली.

हेही वाचा - ऐन दिवाळीत त्यांच्यावर काळाने घातला घाला ; दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू -

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची मान्यता घेतल्यानंतर १५ नोव्हेंबरपर्यंत जिह्यातील पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत योजनांची यादी सादर केली जाणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत ज्या नवीन योजना पूर्ण करण्यास ३ वर्षे व २ वर्षाचा कालावधी लागणार आहे. या योजनांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करावेत, असे आदेश शासनाने दिले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर १० टक्के लोकवर्गणीची अट आहे. यामध्ये प्रत्येकाच्या घरी नळजोडणी हा उद्देश आहे.

असा राहील मंजुरीचा कार्यक्रम

१५ जानेवारी २०२१ पर्यंत यादीमधील पाणी योजनांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक मुख्य अभियंता यांच्या स्तरावर तांत्रिक मान्यता घेणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन ३१ मार्चपर्यंत योजनांना कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता उपाध्ये यांनी दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when gram panchayat finance in ratnagiri due to not water connection in schools in ratnagiri